केंद्रनिहाय मतदार यादी 27 डिसेंबर प्रसिध्द होणार

29 महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर

* निवडणुक आयोगाचे सर्व महापालिकांना निर्देश

मुंबई /9 डिसेंबर : राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम 2025 राज्य निवडणूक आयोगाने आज (09 डिसेंबर) जाहीर केला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदार यादीशी संबंधित या सुधारित कार्यक्रमाच्या बाबतची माहिती 29 महापालिकांच्या संबंधित आयुक्तांना कळवली आहे.
मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम 2025 नुसार, प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र राज्य निवडणूक आयोगाने त्यामध्ये बदल केला आहे. आता 10 डिसेंबर ऐवजी 15 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 15 डिसेंबर ऐवजी आता 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 22 डिसेंबर ऐवजी आता 27 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित या सुधारित कार्यक्रमाच्या बाबतची माहिती 29 महापालिकांच्या संबंधित आयुक्तांना पत्राद्वारे तातडीने कळविण्यात आली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसेच, मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी असल्यास ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात यावा आणि अत्यंत महत्त्वाचे कारण असल्यास दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button