लाडक्या बहिणीकडे वारंवार बोट दाखवल्यास घरी जावे लागेल

भाजप आ.अभिमन्यू पवार यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले

नागपूर /9 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज मंगळवारी (ता. 9 डिसेंबर) दुसरा दिवस असून आजच्या कामकाजात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. या तासामध्ये फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली गुटखा आणि अंमली पदार्थांची विक्री याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण हे प्रश्न उपस्थित करत असतानाच लाडक्या बहिणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीच लाडक्या बहिणींबाबत विधान केले. ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतापून पवारांना खडेबोल सुनावले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, घरी बसावे लागेल, असे स्पष्टपणे फडणवीस विधानसभेत बोलताना पाहायला मिळाले.
भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली गुटखा आणि अंमली पदार्थांची विक्री याबाबत प्रश्न उपस्थित केला. याच मुद्द्यावर बोलताना भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी सुद्धा पोटतिडकीने अवैध दारू विक्रीबाबतचा मुद्दा उचलून धरला. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, याबाबत मी मागील सरकारमध्ये एक आणि आता एक लक्षवेधी मांडली होती. आपल्या दालनामध्ये तीन बैठका झाल्या. त्यावर अजूनही कारवाई नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक आमदाराचा हा विषय आहे. त्यांना रोज काय त्रास, होत आहे हे त्यांना विचारा. लाडक्या बहिणींबाबत आपण सतत बोलतो. लाडक्या बहिणींचे दु:ख काय असेल, तर अवैध दारूवर आळा घालावा, हे आहे. दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली. आपण उत्पादन शुल्क, गृह विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला निर्देश दिले. अध्यक्षांनी निर्देश देऊनही काय होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे, असे सांगत पवार यांनी थेट फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाकडेही बोट दाखविले. आमदार अभिमन्यू पवार यांनी मुद्दा मांडताच मुख्यमंत्री फडणवीस तडक उभे राहिले आणि त्यांनी पवारांना सुनावत म्हटले की, सदस्यांना पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण-लाडकी बहीण. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेची दुसर्‍या योजनांशी तुलना करता येत नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. पण यावेळी फडणवीसांचा पारा आपल्याच पक्षातील आमदारावर चांगलाच चढलेला पाहायला मिळाला होता. परंतु, अभिमन्यू पवारांआधीही काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांना डिवचले होते. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा द्या, असे म्हटले होते. तेव्हाही फडणवीसांनी म्हटले की, कोणत्याही गोष्टी लाडक्या बहीण योजनेला जोडू नका, असे आमदार गायकवाड यांना आणि सर्वच उपस्थितांना स्पष्टपणे सांगितले होते.

संबंधित बातम्या

Back to top button