75 हजार 286 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार नुकसानभरपाईसाठी निधी

* नाशिक कुंभमेळ्यासह, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद

* उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडून सभागृहात घोषणा

नागपूर/8 डिसेंबर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन 2025-26 या वर्षाच्या 75 हजार 286 कोटी 37 लाख 59 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर 10 आणि 11 डिसेंबर रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. पुरवणी मागणीत नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी खर्चासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वैशिष्टपूर्ण कामांसाठी महानगरपालिका तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अनुदान म्हणून 2 हजार 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6 हजार 103 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.
आज सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी 27 हजार 167 कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर 38 हजार 59 कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत. केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने 10 हजार 59 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 15 हजार 648 कोटी, राज्यातील कृषिपंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत प्रशुल्कामध्ये सवलत, सामूहिक प्रोत्साहन म्हणून 9 हजार 250 कोटी, केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी 50 वर्ष बिनव्याजी विशेष कर्ज सहाय्य योजनेंतर्गत 4 हजार 439 कोटी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी केंद्र आणि राज्य हिस्सा म्हणून 3 हजार 500 कोटी, परिवहन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील विविध खर्चासाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास विशेष अर्थसहाय्य म्हणून 2 हजार 8 कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 300 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी 400 कोटी रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींचा हवाई प्रवास आणि अनुषंगिक खर्चासाठी 143 कोटी तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button