दहशतवाद जगासाठी मोठा धोका : पंतप्रधान मोदी

एससीओ शिखर परिषदेत ठाम भूमिका

-पुतिनसोबतही मैत्रीपूर्ण चर्चा
बीजिंग / 1 सप्टेंबर : दहशतवाद हा केवळ एखाद्या देशाचा प्रश्न नसून संपूर्ण मानवतेला घातक ठरणारे संकट आहे. त्यामुळे या विरुद्धची लढाई सामूहिक आणि ठाम असली पाहिजे, असे ठणकावून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चीनच्या तियानजिन येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेतील व्यासपीठावरून जगासमोर भारताची स्पष्ट भूमिका मांडली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासमोर बोलताना मोदी म्हणाले की, भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. पहलगाममधील हल्ल्याने दहशतवादाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. दहशतवादाविरोधी लढाईत कुठल्याही देशाची दुटप्पी भूमिका भारताला मान्य नाही. मोदी यांनी एससीओ संदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भारताची दृष्टी तीन स्तंभांवर आधारलेली आहे. सुरक्षा, जोडणी आणि संधीवर. सुरक्षा, शांतता आणि स्थिरता या कोणत्याही देशाच्या विकासाच्या पायाभूत अटी आहेत. पण फुटीरतावाद, अतिरेकी विचारधारा आणि दहशतवाद हेच आज सर्वांत मोठे आव्हान आहे. कोणताही देश, समाज किंवा नागरिक यापासून सुरक्षित नाही. म्हणूनच भारत लढाईत एकतेवर भर देतो, असे पंतप्रधान म्हणाले.
25 व्या शिखर परिषदेची औपचारिक सुरुवात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भव्य भोजसोबत झाली. या वेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेक देशांचे नेते सहभागी झाले. यंदा चीन अध्यक्षपद भूषवत असल्याने ‘एससीओ प्लस’ शिखर परिषदेसाठी संयुक्त राष्ट्र महासचिव अंतोनियो गुतारेस यांच्यासह 20 परदेशी नेते आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
समारोपानंतर झालेल्या द्विपक्षीय बैठकीसाठी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एकाच कारमधून पोहोचले. मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) हे फोटो शेअर करत लिहिले की, अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतची चर्चा नेहमीच ज्ञानवर्धक असते. तियानजिनमध्ये झालेल्या या भेटीत आम्ही परस्पर संबंध अधिक दृढ करण्याविषयी विचारांची देवाण-घेवाण केली. मोदींनी आणखी एक फोटो शेअर केला, ज्यात ते आणि अध्यक्ष पुतिन हातमिळवणी व आलिंगन करताना दिसत आहेत. अध्यक्ष पुतिन यांची भेट नेहमीच आनंददायी असते, असे त्यांनी या फोटोसोबत लिहिले. ही भेट दोन्ही देशांतील मजबूत राजनैतिक नात्याचे प्रतीक ठरली.

संबंधित बातम्या

Back to top button