कौंडण्यपूरला जाणार विदर्भाची माऊली

भक्तीचा महाकुंभ : रुक्मिणी पालखी निघाली

रामनगरातून 17 मे रोजी होणार प्रस्थान

नागपूर/15 मे -विदर्भाची पंढरी समजल्या जाणार्‍या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या चरणी लीन होण्यासाठी नागपूरनगरी सज्ज झाली आहे. श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे प्रमुख जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वरमाऊली सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ’आई श्री रुक्मिणी पालखी सोहळा 2026’ चे अत्यंत देखणे आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ एक पायी वारी नसून भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा एक अनोखा संगम ठरणार आहे. 17 मे 2026 रोजी सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात, सकाळी ठीक 6 वाजता रामनगर येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातून या पालखीचे प्रस्थान होईल. टाळ-मृदंगाचा गजर आणि ’आई रुक्मिणी माऊली’च्या जयघोषाने अवघी उपराजधानी दुमदुमून जाणार आहे. नागपूरहून निघालेली ही पालखी पेठकालडोंगरी, रिंगणाबोडी, जुनापाणी (खापरी), कारंजा घाडगे, सारवाडी आणि तळेगावहून वर्धा मानेरी व आर्वीमार्गे कौंडण्यपूरच्या श्री रुक्मिणी विदर्भ पीठात दाखल होईल. वाटेत ठिकठिकाणी ग्रामपंचायती, स्थानिक प्रतिनिधी आणि गावकरी माऊलींच्या पालखीचे स्वागत व पूजन करणार आहेत. गावोगावी होणार्‍या या स्वागतामुळे संपूर्ण मार्गावर भक्तीचा चैतन्यमय ओघ पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या

Back to top button