अवैध सावकारी प्रकरणात छापा; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

अकोला शहरात जिल्हा प्रशासनाची पोलिसांच्या देखरेखीत कारवाई

अकोला /25 सप्टेंबर : अवैध सावकारी प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणात अवैध सावकाराच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ होत आहे. अकोला शहरात अवैध सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून अवैध सावकार अक्षय विनायक मानकर (रा. मलेरिया कॉलनी, पावसाळे लेआऊट, कौलखेड, अकोला) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अन्वये धाड कारवाई करण्यात आली. पथक प्रमुख दीपक सिरसाट, पथक सहायक श्रद्धा देशमुख, एम. आर. सोनुलकर, एम. वाय. परतेकी, एन. एस. गोरे आदींच्या चमूने छापा टाकला. अक्षय मानकर याच्याकडून 500 रुपयांचे मुद्रांक, संमतीलेख-1, 100 रुपयांचा मुद्रांक, धनादेश, वाहनविक्रीचा करारनामा छायाप्रत, स्थावरचे खरेदी छायाप्रत आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस बंदोबस्त व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. अवैध सावकारी प्रकरणात छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवैध सावकारीचा फास शेतकर्‍यांभोवती आवळला जात आहे. नैसर्गिक संकट व उत्पादित शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांवर अवैध सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. वेळेत कर्जाची परतफेड न झाल्यास अवैध सावकारीतून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button