जहाल नक्षलवादी शंकर महाका पोलिसांच्या जाळ्यात
एनआयएच्या हिटलिस्टवर होता

-खून, जाळपोळीसह गुन्ह्यांचा डोंगर
गडचिरोली / 14 सप्टेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवा असलेला जहाल नक्षलवादी शंकर भिमा महाका (वय 32, रा. परायणार, ता. भामरागड) याला अखेर गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. भामरागड तालुक्यातील तिरकामेटा जंगल परिसरातून शनिवारी (13 सप्टेंबर) त्याला पकडण्यात आले. तब्बल दोन लाखांचे बक्षीस जाहीर असलेल्या या नक्षल्याच्या अटकेमुळे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.
शनिवारी ताडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी शोधमोहीम राबवत असताना जवानांना जंगल परिसरात एक संशयास्पद व्यक्ती हालचाल करताना दिसली. ताबडतोब ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी त्याला अहेरी येथील प्राणाहिता उपपोलिस मुख्यालयात आणण्यात आले. तपासात त्याची ओळख शंकर महाका अशी पटली.
तपासादरम्यान शंकर महाकाने भामरागड दलममध्ये कार्यरत राहून अनेक गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग घेतल्याचे उघड झाले. विशेषतः 21 जानेवारी 2022 रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज-इरेर मार्गावर पेनगुंडा रस्त्याच्या कामावर तैनात वाहनांवर नक्षल्यांनी केलेल्या विध्वंसक हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेत तब्बल 19 वाहने पेटवण्यात आली होती. अंदाजे 2 कोटी रुपयांचे नुकसान या कारवायेमुळे झाले होते. शंकर महाका 2016 ते 2022 या काळात नक्षल्यांच्या जनमिलिशिया संघटनेमध्ये सक्रीय होता. त्या माध्यमातून कार्यरत राहून त्याने नक्षल चळवळीमध्ये प्रभाव वाढवला. त्यानंतर त्याने थेट भामरागड दलममध्ये प्रवेश केला आणि महत्त्वाच्या कारवायांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. रेकीसाठी तो तिरकामेटा जंगल परिसरात उपस्थित असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.




