फडणवीसांना सात बारा कोरा करावाच लागेल

बच्चू कडूंचा ’प्रहार’, सरकारला दिला

* आज बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम 
* विमान वाहतूक आणि रेल्वे सेवा ठप्प करण्याचा इशारा इशारा

* महाएल्गार मोर्चाची नागपूरात धडक

* हजारो ट्रॅक्टर बैलगाड्या, मेंढपाळ बांधवांचा सहभाग

* प्रचंड गर्दीमुळे विविध मार्गावरील वाहतूक ठप्प

नागपूर /28 ऑक्टोबर : सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, दिव्यांगांना न्याय देणे आणि इतर 20 प्रमुख मागण्यांसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी, 28 ऑक्टोबर रोजी नागपुरात महा एल्गार काढला आहे. या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत ते नागपुरातच थांबणार असल्याचे जाहीर केले असून, हजारो आंदोलकांनी शहरात चक्काजाम केले आहे. बच्चू कडू यांनी म्हटले की, 12 तास नव्हे तर 12 महिने थांबावे लागले तरी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत जाणार नाही; तसेच, 29 ऑक्टोबर रोजी 12 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही थांबवण्यात येईल, असे इशाराही त्यांनी दिले. त्यांनी सरकारला अल्टीमेटम देत सांगितले की शेतकर्यांचा 7/12 कोरा करावा लागेल, अन्यथा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे कूच करतील. बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत, मुंबईसाठी केवळ रस्ते आणि शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटींचा खर्च का, असा प्रश्न उपस्थित केला आणि शेतकर्यांना आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन केले. आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा मिळाला असून, हैदराबाद आणि जबलपूर मार्ग आधीच जाम झाले आहेत. सुरक्षा कारणास्तव प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान आणि अन्य महत्त्वाचे ठिकाणे पोलीस बंदोबस्ताखाली आहेत. आंदोलनात वर्धा येथून बुटीबोरीत दाखल झालेले हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळ बांधव सहभागी झाले असून, अन्नसामुग्रीची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. सोलापूरहून 20 हजार भाकर्‍या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ, तसेच इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य नागपुरकडे रवाना झाले आहेत.

* मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

बच्चू कडू यांच्या इशार्‍यानंतर प्रशासन सतर्क झाले असून रामगिरी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’वर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने त्यांच्या या इशार्‍यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

*आता मागे हटायचे नाही
शक्तीपीठ महामार्ग का करायचा? मुंबईत एवढे हजारो कोटी खर्च करायची गरज का? मुंबईचे स्वतःचे इतके बजेट असताना आणखी खर्च का? असे प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले आणि म्हणाले, आणखी किती दिवस सहन करायचे — आता मागे हटायचे नाही. तुमच्यावर त्रास होतोय, जेवण-पाण्याची अडचण आहे, पण ही लढाई एका दिवसाची नाही तर आयुष्यभराची लढाई आहे; गावाकडे परतू नका, ‘एकदा गेले काय झाले’ हे विचार करून परतू नका, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येणार हे अपेक्षित नव्हते, पण तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी चारही दिशांमधून आलेत, तुमच्या प्रयत्नांना माझा सलाम, असा कडू म्हणाले. तुम्हाला येथे थांबवण्यासाठी मागे जावे लागले तर बाजूचा बगीचा, कार्यालयं ताब्यात घ्यावीत; दरवाजे तोडावे लागले तर तोडू आणि ताबा घेतलेले त्यांच्या आहेत — असाही लढाऊ इशारा त्यांनी दिला. आता मागे हटायचे नाही.

संबंधित बातम्या

Back to top button