राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश

आ.रवी राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास

* अमरावतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण

अमरावती /28 डिसेंबर : गोर-गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आ.रवी राणा यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर आणि लोकसेवेला समर्पित नेतृत्वावर विश्वास ठेवत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमरावती शहर महिला अध्यक्ष सुचिता वणवे यांनी हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला.
या घडामोडीमुळे अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. आ.रवी राणा यांच्या गंगा सावित्री येथील निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सुचिता वणवे यांनी युवा स्वाभिमान पक्ष तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. लोकनेते आमदार रवी राणा हे सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होतात. जनतेच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरून लढा देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा आणि विकासकामे अधिक प्रभावीपणे करता येतील, या विश्वासातूनच आम्ही हा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार रवी राणा यांनी सौ. सुचिता वणवे व त्यांच्या सहकार्‍यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, युवा स्वाभिमान पक्ष हा केवळ राजकीय व्यासपीठ नसून जनतेच्या स्वाभिमानाची चळवळ आहे. महिलांना, युवकांना आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम पक्ष सातत्याने करीत आहे. जमीनीवर काम करणार्‍या, संघटन बांधणार्‍या नेत्या पक्षात आल्याने आमची ताकद निश्चितच वाढेल. युवा स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, अमरावती शहर अध्यक्ष संजय हिगासपुरे, नाना आमले, शैलेंद्र कस्तुरे, समीक्षा गोटफोडे, किरण अंबाडकर, घनश्याम डकरे, विलास शेरेकर, जयश्रीताई सोनुले, संगीता ठाकूर, अलका बावणे, सुहासनी धोंडे, अनिता मेश्राम, चांदणी प्रजापती, जयश्री लोणारे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे अमरावती शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात युवा स्वाभिमान पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button