तरुण विवाहित युवकाची गळफास घेवून आत्महत्या
भातकुली तालुक्यातील आष्टी येथील घटना

* पत्नीच्या विरहाने संसाराची राखरांगोळी
अमरावती /6 मार्च – भातकुली तालुक्यातील आष्टी गावात एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चंदू बबनराव लोखंडे असे मृत तरुणाचे नाव असून संसारातील कलहातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंदू लोखंडे हा विवाहित होता मात्र काही काळापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याने तो मानसिक विवंचनेत होता. गुरुवारी 5 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास जेव्हा चंदूची आई काही कामासाठी घराबाहेर पडली होती तेव्हा घरात कोणीही नसताना चंदूने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला. आई घरी परतल्यानंतर मुलगा फासावर लटकलेला पाहून तिने एकच हंबरडा फोडला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून चंदूला जिल्हा रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. एका हसत्या खेळत्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने आष्टी गावावर शोककळा पसरली आहे.
तपासाचे चक्र वेगात-वलगाव पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून चंदूच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पत्नी सोडून गेल्याचे दुःख की अन्य काही कौटुंबिक कारण या दिशेने पोलीस चौकशी करत असून शवविच्छेदन अहवालानंतर अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .




