महिलांनी ‘सुपरवुमन’ होण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

संजिता महापात्र यांचे प्रतिपादन

* महावितरणतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

अमरावती /9 मार्च : महिला आपल्या दैनंदिन जीवनात कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्र अशा विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडत असतात. निसर्गाने महिलांना अनेक गुण दिले असले तरी ‘सुपरवुमन’ बनण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. महिलांनी सर्वप्रथम स्वतःला एक ‘ह्युमन बिइंग’ म्हणून ओळखून आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन, अमरावती येथे महावितरणतर्फे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे मुख्य अभियंता अशोक साळुंके होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के, महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अधीक्षक अभियंते दिपक देवहाते, दीपाली माडेलवार आणि प्रणोती देशमुख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना संजिता महापात्र म्हणाल्या की, महिलांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन साधणे आवश्यक आहे. ‘भगिनी’ हा शब्द केवळ संबोधनापुरता मर्यादित न ठेवता महिलांनी एकमेकींच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच जीवनातील अडचणींमध्ये अडकून न पडता आपण समाजासाठी आणि कुटुंबासाठी दिलेल्या सकारात्मक योगदानाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. मात्र, महिलांच्या प्रगतीत पुरुषांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून कर्करोगासारखे आजारही योग्य वेळी निदान झाल्यास पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि सर्व्हायकल कर्करोग यांसारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक साळुंके म्हणाले की, असमाधान ही अनेक आजारांची मूळ कारणे असतात. त्यामुळे केवळ अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण समाजाला आणि सहकार्‍यांना काय सकारात्मक देऊ शकतो, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. त्यांनी उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे तसेच अधीक्षक अभियंता दीपाली माडेलवार आणि प्रणोती देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक कल्पना भुले यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक विधी अधिकारी आद्यश्री कांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता रूपा भारती यांनी मानले.

संबंधित बातम्या

Back to top button