बडनेराच्या गवळीपूर्‍यात महिलेची निर्घुन हत्या

गर्भवती महिलेसह तिघे गंभीर जखमी

-चाकूने केले सपासप वार
-शेजार्‍यांचे कृत्य, चारही आरोपी फरार
अमरावती / 14 जुलै: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात एका 30 वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करुन निर्घुन हत्या करण्यात आल्याची घटना बडनेरा नवीवस्ती भागातील गवळीपूरा येथे आज सोमवारी, रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. निलोफर शेख जमीर असे मृतक महिलेचे नाव आहे. यावेळी निलोफरला वाचविण्यासाठी मध्ये पडलेली तिची बहिण सलमा नौशाद चौधरी (32), सलमाची मुलगी सनम चौधरी (16) आणि शेख सलीम हा 36 वर्षीय युवक जखमी झाले आहेत. सलमा चौधरी ही गर्भवती आहे. त्यांना उपचारासाठी अमरावती येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. निलोफरच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबातील चौघांनी हे हत्याकांड घडवून आणले. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. चारही आरोपी फरार असून बडनेरा पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेने बडनेरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार गवळीपूरा परिसरात असलेल्या इंदिरा नगर येथे निलोफर शेख जमीर राहत होती. शेजारी राहणारा गुड्डू शहा नामक व्यक्ती रात्री आठ वाजताच्या सुमारास लहान मुलांना चाकू दाखवून धमकावत होता. हे पाहून निलोफर हिने त्यास जाब विचारला. त्यावरून गुड्डू संतापला दोघांत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गुड्डूसह त्याचा भाऊ राजा, एक अज्ञात तरुण व त्यांची आई यांनी मिळून धारदार निलोफरच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला केला.
या अमानुष हल्ल्यात निलोफर यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेख सलीम (36), सनम मिर्झा अफसर बेग (16) आणि सलमा चौधरी अजहर चौधरी (28) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर प्रथम इर्विन रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर स्थिती गंभीर असल्याने त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व घटनेचा आढावा घेतला.

संबंधित बातम्या

Back to top button