दाजीसाहेबांचे कार्य, तपोवनचा संघर्ष बघून विद्यार्थी गहिवरले
तपोवनला विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची भेट

अमरावती /8 मार्च : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या 50 विद्यार्थ्यांनी नुकताच डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनला भेट दिली. तपोभूमी मधील कुष्ठरुग्ण अनाथ परितक्या महिला आदिवासी मुलांसाठी चालविले जाणारे उपक्रम आणि संस्थेसमोर असलेली आव्हाने ऐकून विद्यार्थी वर्ग गहिवरले. निमित्त होते विज्ञान दिवसाचे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदे च्या सदस्या डॉ. मनीषा कोडापे यांच्या पुढाकाराने पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन मागील 80 वर्षांपासून सुरू असलेले कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन कार्यासोबतच अनाथ परितक्या महिलांचा विकास महामना मालवीय विद्यालयाच्या माध्यमातून गरीब अनाथ व आदिवासी मुलांसाठी शिक्षणाचे प्रयोग केले जात असून महामना मालवीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाचे प्रयोग आणि माहिती देण्यासाठी पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थ्यांनी तपोवनला भेट दिली. त्यांच्यासोबत विद्यापीठ सिमेंटच्या सदस्य प्रा. डॉ. भाग्यश्री बारब्दे पर्यावरण तज्ञ डॉ. जयंत वडतकर उपस्थित होते. तपोवन मध्ये सुरू असलेले उपक्रम तेथील वृद्धाश्रम महिलांच्या चित्तथरारक कथा, संस्थेसमोर दररोज कुष्ठ बांधवांच्या विकासासाठी येणार्या समस्या याबाबत तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी सविस्तर माहिती दिली.




