सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करणार
खा.बळवंत वानखडे आक्रमक

* जिल्ह्यातील आठ तालुके नुकसानग्रस्त यादीतून वंचित
अमरावती /10 ऑक्टोबर : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, शासनाने राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पूरबाधित म्हणून घोषित केली आहेत. या बाधित तालुक्यांसाठी सरकारने 7 ऑक्टोबर रोजी ‘विशेष मदत पॅकेज’ जाहीर केले असून, त्याअंतर्गत मिळणार्या नऊ सवलतींबाबतचा शासन निर्णय 9 ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला. मात्र, या निर्णयामध्ये अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके या विशेष मदत पॅकेजच्या लाभापासून वंचित राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची घोषणा केली आहे, परंतु यातून सरकारचा लबाडपणा उघड झाला आहे. अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील शेती उध्वस्त झाली असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांना दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी असताना, जिल्ह्यातील आठ तालुके मदतीपासून वंचित राहणार आहेत. या तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही किंवा नुकसान झाले नाही, असा कोणताही प्रश्न नाही; शेतीचे सर्वत्र नुकसान झाले असूनही सरकारने दुजाभाव बाळगणे योग्य नाही, असेही बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केले. सोयाबीन, कापूस, तूर यासह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उर्वरित तालुक्यांनाही मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आणि सरकारविरुद्ध काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा दिला.
शासनाच्या निर्णयानुसार अमरावती, चांदूर बाजार, माशेरी, धारणी, चिखलदरा आणि नादगाव खडग येथील सहा तालुक्यांचा समावेश केला गेला आहे. मात्र, तिवसा, धामणगाव रळे, चांदूर रळे, भातकुली, दयारपूर, अजनगाव सजुरी, वरुड आणि अचलपूर या आठ तालुक्यांना वगळण्यात आले आहे. वास्तविक, या वगळलेल्या तालुक्यांमध्येही शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शासनाच्या ‘विशेष मदत पॅकेज’मध्ये त्यांचा समावेश न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागीय आयुक्त आणि कृषी विभागाकडून पाठवलेल्या तपशीलावरूनही या तालुक्यांचे नुकसान स्पष्ट असून, प्रशासनात याबाबत सखोल चर्चा सुरू आहे.




