बडनेरा परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना आवाहन
आठवडी बाजारात स्वीपद्वारे आयोजन

अमरावती /28 डिसेंबर : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त माननीय सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप विभागामार्फत शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदार जनजागृती केली जात आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बडनेरा मधील आठवडी बाजारात उपस्थित ग्राहक,व्यापारी, नागरिक व मतदार यांच्यासाठी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.तसेच उपस्थित नागरिकांना मतदानची शपथ देण्यात आली.पथनाट्याच्या माध्यमातून मतदान का आवश्यक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे महत्त्व काय आहे, तसेच मतदान न केल्यास होणारे परिणाम याविषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आले. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरीही प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणे का गरजेचे आहे, याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी सादर करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास सहा. आयुक्त धनंजय शिंदे, उपअभियंता श्रीरंग तायडे,स्वीप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, उज्वल जाधव, कैलास कुलट, सोमेश वानखडे, संजय बेलसरे, निजामउद्दीन काझी, सुषमा दुधे, शुभांगी सुने,ज्योती बनसोड, अर्चना रडके, चेतना बोंडे, प्रियंका हंबर्डे, चंचल दातीर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अमरावती महानगरपालिका व स्वीप विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होऊन आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल.




