अंजनगाव बारी येथे कोंबड्या वाहून नेणारे वाहन उलटले

500 कोंबड्या मृत्युमुखी, शेतकर्‍याचे नूकसान

-नालीवरील रपटा खचल्याने अपघात
अंजनगाव बारी/ 23 जुलै : नालीवरील कमकूवत झालेला रपटा कोंबड्या वाहून नेत असलेल्या आयशर वाहनाच्या भाराने खचला आणि वाहन उलटले. त्यात जवळपास 500 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. ही घटना अंजनगाव बारी येथील आसरा नगर मध्ये गजानन महाराज मंदिरासमोर घडली. अपघातात शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. अवैध अतिक्रमन आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष या घटनेस कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी, पशुपालक उमेश आखरे यांनी केला आहे.
उमेश आखरे यांचे अंजनगाव बारी येथे शेत असून तेथे त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. शेतात जाण्यासाठी एकच रस्ता आहे. या रस्त्यावरील एका नालीवर सध्या रपटा बांधण्यात येत आहे. त्यासाठीचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. आजूबाजूला काही लोकांनी अतिक्रमन केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. येथून वाहन काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. आज मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास आखरे यांच्या पोल्ट्री फॉर्मवरुन कोंबड्या घेउन आयशर वाहन निघाले. अरुंद मार्गावरुन वाहन चालविण्याचा वाहनचालक प्रयत्न करित असतानाच वाहन नालीवर पोहोचले तेव्हा जिर्ण रपटा खचला आणि वाहन उलटले.
अपघातात आयशर वाहनातील जवळपास 500 कोंबड्या मरण पावल्या आणि आखरे यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नूकसान झाले. सुदैवाने या अपघातात वाहनचालकाचे प्राण वाचले. या मार्गावर पुढे असाच अपघात घडून मनुष्यहानी होण्याची शक्यता असल्याने येथील अतिक्रमन हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा आणि नालीवर मजबूत रपटा बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button