जिल्हा परिषद निविदा प्रक्रियेत अनधिकृत हस्तक्षेप

सिंचन-बांधकाम विभागात गैरव्यवहाराचे आरोप

-ठेकेदार नसलेले लोक टाकतात दबाव
-नोंदणीकृत ठेकेदारांचा सीईओंडे लेखी आक्षेप
अमरावती / 9 सप्टेंबर : जिल्हा परिषदेच्या सिंचन व बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेत बाहेरील लोक अनधिकृत हस्तक्षेप करून ठेकेदारांना त्रास देत असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद नोंदणीकृत ठेकेदारांनी केला आहे. या संदर्भात समीर पाटील, गजानन भडके, राहुल राठी व आनंद पोलाड या ठेकेदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्याकडे थेट लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जे लोक अधिकृतपणे जिल्हा परिषद ठेकेदार नाहीत, तेच कामांच्या निविदेत अवांछित हस्तक्षेप करत आहेत. ठेकेदारांना थेट सांगितले जाते की हे काम आम्हाला दिले गेले आहे, तुम्ही अर्ज भरू नका. अगदी निविदा अर्ज भरल्यानंतर देखील संबंधित ठेकेदारांना तो मागे घेण्यासाठी भाग पाडले जाते. त्यामुळे योग्य स्पर्धेला धक्का बसत असून कामकाजात गोंधळ निर्माण होत आहे.
ठेकेदारांनी सीईओ संजिता मोहपात्रा यांना दिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, कार्यकारी अभियंत्यांना स्पष्ट आदेश देऊन अशा गैरप्रकारांना आळा घालावा. तसेच केवळ जिल्हा परिषद नोंदणीकृत ठेकेदारांनाच सिंचन व बांधकाम विभागातील कामात सहभाग द्यावा. जर यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर हा गंभीर प्रकार सरकारच्या लक्षात आणून दिला जाईल, असा ठाम इशारा ठेकेदार समीर पाटील, गजानन भडके, राहुल राठी व आनंद पोलाड यांनी त्यांच्या पत्रातून दिला आहे.
-टेंडर क्लर्ककडे दिवसभर डेरा
तक्रारदार ठेकेदारांनी सांगितले की, हे लोक जिल्हा परिषदेत ठेका पद्धतीतील करारनामा व टेंडर प्रक्रियेत काम पाहणारे क्लर्क सुरेंद्र गायकवाड यांच्या जवळ दिवसभर बसून राहतात. त्यांचा प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेशी काही संबंध नसतानाही, ते ठेकेदारांच्या हालचालींवर प्रभाव टाकतात. अगदी सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व बाब स्पष्ट होईल, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button