जबरी चोरी प्रकरणात दोघे पोलिसांच्या जाळ्यात
एक विधीसंघर्षित बालक, यशोदा नगरातील घटना

अमरावती / 1 सप्टेंबर : शहरातील यशोदा नगर चौकात 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अमरावती गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी भास्कर महादेव सरगे हे आपल्या मोपेडने चौकात गेले असता तीन अनोळखी तरुणांनी त्यांना अडवून लाठीचा धाक दाखवत खिशातील पर्समधील 650 रुपये हिसकावून घेतले. त्याचवेळी दुचाकीची किल्ली घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सरगे यांनी आरडाओरड केली. तत्काळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने एक आरोपी रंगेहात पकडला गेला, तर इतर दोन पळून गेले.
या घटनेची तक्रार प्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांच्या पथकास तातडीने शोधमोहीमेचे आदेश देण्यात आले. गुप्त बातमीदाराच्या खात्रीलायक माहितीवरून पथकाने आज 1 सप्टेंबर रोजी आरोपी राहुल दीपक धर्माळे (वय 19, रा. यशोदा नगर, गल्ली क्र. 1) व एका विधिसंघर्षी बालकास ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासासाठी प्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एपीआय महेश इंगोले, अमलदार सुनील लासुरकर, दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, जहिर शेख, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, विशाल वाकपांजर, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे व निलेश वंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.




