जबरी चोरीच्या प्रकरणात बडनेराच्या दोघांना अटक
पोलिसांनी सहा तासात केले गजाआड

अमरावती / 6 जुलै: पायदळ जात असलेल्या एका महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढणार्या बडनेरा येथील दोन आरोपींना फ्रेजरपूरा पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत अटक केली. जोग स्टेडियम परिसरात शनिवारी, सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या चोरट्यांनी आणखी एका इसमाचे 3 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावल्याची माहितीही पुढे आली आहे.
आकाश भिकू भोयर (31) आणि कुलदीप राजेंद्र करिहार (31, दोघेही रा. तिलक नगर, जुनीवस्ती, बडनेरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रेश्मा संदीप तायडे (30, रा. आदर्श नगर) या महिलेने फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेश्मा तायडे या आपला मुलगा संदिप याला गणेशदास राठी विद्यालयातून आणण्यासाठी जात होत्या. जोग स्टेडियमनजीक दोन युवक मोपेड दुचाकीवरुन मागून आले. त्यांनी तायडे यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकला आणि तेथून पळ काढला.
रेश्मा तायडे यांनी लगेच फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविली. मोपेडचा क्रमांक त्या पाहु शकल्या नाही परंतू एका आरोपीचे वर्णन त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याच आरोपींनी फ्रेजरपूरा परिसरातील रहिवासी हसन गुल्लू नंदावाले यांनाही धमकावून जबरीने 3 हजार रुपये हिसकल्याचे तायडे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर फ्रेजरपूरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या भागातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी कैद झाले होते. पोलिसांनी दोघांचीही ओळख पटविली. ते बडनेरा येथील रहिवासी आकाश भोयर आणि कुलदिप करिहार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही सहा तासाच्या आत अटक केली. ही कारवाई फ्रेजरपूरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक निलेश गावंडे, डीबी पथकाचे प्रमुख उपनिरिक्षक राहुल महाजन, सहाय्यक उपनिरिक्षक योगेश श्रीवास, शिपाई हरीश चौधरी, शशिकांत गवई, सुरज यादव, जयेश परिवाले, रोशन वर्हाडे, निखिल माहुरे, अमोल राठोड यांच्या पथकाने केली.




