मध्यप्रदेशातील दोन अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

जिल्हयात घरफोडी आणि लुटमारी करुन दहशत माजविणारे

वरुड । 23 डिसेंबर – संपुर्ण जिल्हयात घरफोडी आणि लुटमारी करणार्‍या मध्यप्रदेशातील दोन अटटल गुन्हेगांरांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांचेकडून तब्बल 10 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. या दोन्ही गुन्हेगारांच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढते घरफोडीचे प्रमाण पाहता पोलीस अधिक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेस दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक गुन्हयांची उकल करण्यासाठी मोर्शी हद्दीत प्रयत्नरत असतांना गुप्त बातमीदाराकडुन पथकास खात्रीशिर माहिती मिळाली की, पांढुर्णा येथील सराईत गुन्हेगार चरणसिंग भादा हा त्याचे एका साथीदारासह सिंभोरा परिसरात फिरत आहे. सदर आरोपी हा सराईत घरफोड्या असल्याने पथकाने चरणसिंह गब्बुसिंह भादा (35) रा.शास्त्री वार्ड ह.मु. अंबाडा, ता.जि.पांढुर्णा, मध्यप्रदेश आणि रवी उर्फ रंजीत राजेश चव्हाण (23), रा.शास्त्री वार्ड, पांढुर्णा, मध्यप्रदेश या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले व कौशल्यपुर्ण विचारपुस दरम्यान त्यांनी दिलेल्या कबुलीवरुन हे सर्व 15 घरफोडी व लुटमारीचे गुन्हे जिल्हयातील पोलिस स्टेशन मोर्शी, वरुड, बेनोडा (शहीद), चांदुर बाजार, तिवसा, कुर्‍हा पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेले आहेत. सदर आरोपीतांकडुन घरफोडी व लुटमारीचे गुन्हयातील 71 ग्रॅम सोने, बाजारभाव किंमत 9 लाख 40 हजार रुपये, नगदी 50 हजार रुपये आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल, किंमत 25 हजार रुपये या प्रमाणे एकुण 10 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन मोर्शीचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी चरणसिंग गब्बुसिंग भादा, रा.पांढुर्णा, मध्यप्रदेश हा अट्टल घरफोड्या असुन त्याचेवर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यामध्ये 50 चे वर घरफोडी व लुटमारीचे गुन्हे नोंद आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वातील पोलिस उपनिरिक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, भुषण पेटे, पंकज फाटे, चालक संजय प्रधान यांचे पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button