चाकू व कोयत्यासह दहशत माजविणारे दोघे जेरबंद

राठी नगर परिसरातील घटना

-गाडगेनगर परिसरातील घटना
अमरावती / 13 जुलै: येणार्‍या जाणार्‍यांना हातातील चाकू व कोयता दाखवून तसेच शिवीगाळ करुन राठी नगर परिसरात दहशत माजविणार्‍या दोघांना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शिताफीने जेरबंद केले. या प्रकारामुळे या भागात काही काळ खळबळ उडून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरज किशोर चव्हाण (20), आणि प्रमोद रामभाउ पाटील (45, रा. दोघेही संजीवनी कॉलनी, राठीनगर, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. रात्री सुरज चव्हाण आणि प्रमोद पाटील हे राठीनगरातील संजीवनी कॉलनी भागात हातात कोयता आणि चाकू ही प्राणघातक शस्त्र घेउन दहशत पसरवित होते. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना शिवीगाळ करुन ते शस्त्राच्या धाकावर धमकावत होते. त्यामुळे परिसरातील रहिवासी भयभित झाले. कोणीतरी याबाबत फोनवरुन गाडगेनगर पोलिसांना सूचना दिली.
त्यानंतर डीबी पथक काही वेळातच संजीवनी कॉलनीत दाखल झाले. त्यांनी शिताफीने सुरज चव्हाण आणि प्रमोद पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळचा चाकू आणि कोयता जप्त करण्यात आला. दोघांवरही गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरिक्षक अतुल वर, गुन्हे शाखेच्या निरिक्षक विजय पंधरे, प्रशासन पोलिस निरिक्षक समाधान वाठोरे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जावेद अहमद, हेकॉ भारत वानखडे, राजेश गुरेले, शिपाई नंदकिशोर करोची, गुलरेज खान, महेश शर्मा, रुपेश हटकर, धनराज कुंभरे यांनी केली.
-युवकाकडून कोयता जप्त
अन्य एका कारवाईत गाडगेनगर पोलिसांनी 28 वर्षीय युवकाकडून धारदार कोयता जप्त केला. आकाश साहेबराव वानखडे (रा. रेतीवाल्याच्या बाजूला, विलास नगर) असे आरोपीचे नाव आहे. आकाश कोयत्यासह परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाने विलास नगरात पोहोचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळचा कोयता जप्त केला. आकाश वानखडेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button