44 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या, तत्काळ रुजू होण्याचे आदेश, अंमलबजावणी नाही
मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

अमरावती / 17 मार्च : महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय शिस्त आणि स्वच्छतेचा कारभार सुधारण्यासाठी खुद्द आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला त्यांच्याच हाताखालील कर्मचार्यांनी हरताळ फासला आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी 13 मार्च रोजी तब्बल 44 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते.
मात्र, आज 17 मार्च उलटूनही एकही महाभाग आपल्या नवीन ठिकाणी रुजू झालेला नाही. ’तात्काळ’ अंमलबजावणीचे आदेश असतानाही हे अधिकारी अजूनही जुन्याच जागी ठाण मांडून बसल्याने, पालिकेत नक्की कोणाचे राज्य चालते, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. अमरावती शहराच्या स्वच्छतेचा कणा मानल्या जाणार्या आरोग्य विभागात सध्या अजब गजब कारभार पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि नवीन प्रभाग रचनेनुसार कामात सुसूत्रता यावी, म्हणून आयुक्त स्तरावरून आरोग्य निरीक्षकांच्या खांदेपालटाचा निर्णय घेण्यात आला होता. स्वच्छतेचा दर्जा सुधारावा आणि कोणाचेही हितसंबंध एकाच ठिकाणी गुंतून राहू नयेत, हा यामागचा मुख्य हेतू होता. त्याप्रमाणे 13 मार्च 2026 रोजी स्वच्छता विभागाने अधिकृत पत्र काढून 44 निरीक्षकांना त्यांच्या नवीन प्रभागात हजर होण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की, आदेश मिळताच संबंधित निरीक्षकांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्याचा अहवाल सादर करावा. मात्र, चार दिवस उलटूनही पालिकेच्या या आदेशाची साधी दखलही कोणी घेतलेली दिसत नाही. हे आरोग्य निरीक्षक नेमके कोणाच्या आशीर्वादाने जुन्याच जागी बसून आहेत, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशात केवळ बदल्याच नव्हत्या, तर सफाई कामगारांचे नियोजन, कंत्राटदारांच्या कामावर लक्ष ठेवणे आणि रोजचा अहवाल सादर करणे अशा कडक सूचना होत्या. जर कोणी आदेश पाळला नाही, तर प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. पण सध्यातरी या कारवाईची भीती कोणालाही वाटताना दिसत नाही. बदली झालेल्या या यादीत अनिकेत राजेंद्र महल्ले, परीक्षित गोरले, रोहीन हडाले, संजय माहुरकर, शाहू शरदराव जवंजाळ, इम्रान खान, आवेश शेख, सय्यद असरारूल हक्क, आतिव आकिब अहमद, निखील खंगाळे, पार्थ प्रवीण हरमकर, आशिष सहारे, धनिराम कलोसे, मनिष नकवाल, सुनिल चोरपगार, सागर इंगोले, निलेश तांबोळे, धर्मेंद्र डिके, शक्ती पिवाल, प्रवीण उसरे, सुमेध मेश्राम, प्रसाद कुलकर्णी, शैलेश डोंगरे, मनिष हडाले, योगेश खंडारे, मिथुन उसरे, प्रशांत गावनेर, जिवन राठोड, धरम संगेले, विलास डेंडुले, मोहीत जाधव, अनिकेत फुके, अंजिक्य दि जवंजाळ, दिपक सांगले, दर्शन देशमुख, ए.के. गोहर, मिथुन वाघमारे, सागर राजूरकर, सोपान माहुलकर, मिथुन मनोज चावरे, पवन चावरे, वैभव खरड, प्रियंका बेस आणि मेघराज डेंडवाल या सर्वांची नावे आहेत. प्रशासनाच्या या अशा ढिसाळपणामुळे शहरात हसवेपणा होत असून, पालिकेच्या शिस्तीचे वाभाडे निघाले आहेत. साहेबानं हुकूम दिला पण शिपायानं तो मानला नाही अशी काहीशी परिस्थिती सध्या अमरावतीत पाहायला मिळत आहे. जर खुद्द आयुक्तांच्या आदेशाची अशी उघडपणे अवहेलना होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय होत असेल, याचा विचारच न केलेला बरा. आता या प्रकरणावर प्रशासन काही कडक पाऊल उचलणार की हे अधिकारी असेच मनमानी कारभार करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
प्रशासनाचा धाक संपलाय काय? – शासकीय आदेश म्हणजे थट्टा झाली आहे. आयुक्तांनी बदल्या केल्या पण हे अधिकारी खुर्ची सोडायला तयार नाहीत. ही निव्वळ मनमानी असून, अशा कामचुकार लोकांमुळे शहराची स्वच्छता वार्यावर आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी आता हलगर्जीपणा करणार्यांवर तात्काळ बडगा उचलावा, हीच नागरिकांची मागणी आहे




