भीमकुंडात कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड
चिखलदराचं निसर्गसौंदर्य खुललं!

-डोळ्यांचं पारणं फेडणारं विहंगम दृश्य
-पाउस आणि धुक्यांमध्ये नंदनवन गुडूप
अमरावती / 13 जुलै: चिखलदरापासून परतवाडा मार्गावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला घनदाट जंगलाआड असलेल्या भीमकुंड या निसर्गरम्य स्थळाच सौंदर्य सध्या पावसाळ्यात चांगलच खुललं आहे. पर्यटकांना हे ठिकाण भुरळ घालत आहे. अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि महाराष्ट्र, मध्यप्रदेशातूनही या जलप्रतापाचा आनंद लुटण्यासाठी चिखलदरा येथे पर्यटकांची झुंबड उडाली आहे. हजारो पर्यटक या विदर्भाच्या नंदनवनाला भेट देत असल्याने संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे.
चिखलदर्यातील आकर्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या या ठिकाणावर साडेतीन हजार फूट खोल दरीत बाजूच्या उंच डोंगरावरून धबधबा कोसळतो. या मोठ्या धबधब्यासोबतच डोंगराच्या विविध ठिकाणांवरून लहान-मोठे अनेक धबधबे दरीत विसावतात. डोंगरावरून वाहणारं लहान धबधब्याचं पांढरं शुभ्र पाणी मन आणि डोळे तृप्त करून टाकतं. भीमकुंडात पांढर्या शुभ्र पाण्याचा कोसळणारा धबधबा पर्यटकांची नजर खिळवून ठेवतो आहे.
मेळघाटात मागील पंधरा दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. भीमकुंड ज्या भागात आहे तो परिसर काळ्या डोंगरांनी वेढला असून मेळघाटच्या जंगलातून वाहत येणारं पावसाचं पाणी धबधब्याच्या स्वरूपात भीमकुंडात कोसळतं. जंगलातून वाहत येणार्या पाण्याचे झरे या डोंगरातून अनेक ठिकाणी कोसळताना दिसतात. केवळ जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धबधब्याचं सुंदर दृश्य येथे पाहायला मिळतं. पावसासोबतच खोल दरातील धुक्यामध्ये अनेकदा हा धबधबा गुडुप झाल्याचा भास होतो. धुक्यांच्या आड पाणी कोसळण्याच्या जोरदार आवाजासह ओझरत्या स्वरूपात दिसणारा धबधबा पाहतानाची वेगळी मजा पर्यटक लुटताना दिसत आहेत.
भीमकुंडाचा संबंध आख्यायिकेतून थेट महाभारत काळाशी जोडला जातो. द्युत या खेळात कौरवांकडून पराभूत झालेल्या पांडवांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. एक वर्षाचा अज्ञातवास हा पांडवांनी विराट राजाच्या राज्यात घालवला. चिखलदरा लगत असणारा आजचा वैराट प्रदेश हा विराट राजाचा प्रदेश असल्याची आख्यायिका आहे. अज्ञात वासात पांडव याच विराट नगरीत होते.
याठिकाणी युधिष्ठिर हे कंक नावानं मंत्री होते. तर भीम हे वल्लभ नावानं स्वयंपाकी, अर्जुन हे बृहन्नडा या नावानं स्त्रीवेशात नृत्य शिकण्याचं काम करायचे. नकुल हे ग्रांथिक नावानं घोड्यांची देखभाल करायचे, सहदेव हे तांत्रिपाल या नावानं गायी, बैल राखायचं काम करायचे आणि द्रौपदी या सैरंध्री यांची दासी म्हणून काम करत. राजाच्या दरबारात सेनापती असणार्या किचक या राक्षसानं द्रौपदीवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला. याची माहिती भीमाला समजली. यानंतर भीमाने किचकचा वध केला आणि त्याला खोल दरीत फेकून दिलं. दरीवरून खाली कुंडात कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यानं भीमानं हात धुतलेत. या प्रसंगावरून हा परिसर किचकदरा आणि पुढं याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा झाला. धबधबा ज्या कुंडात कोसळतो त्याला भीमकुंड नाव पडलं. अशी ही आख्यायिका आहे.
-पावसाळ्यात गर्दी
भीमकुंड इथला नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. अमरावतीसह नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून येणार्या पर्यटकांची अधिक गर्दी इथं होते. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे या महाराष्ट्रातील भागातून तसेच मध्यप्रदेशातूनही पर्यटक येथे येतात. 15 ऑगस्टपर्यंत हा परिसर पर्यटकांनी अगदी गजबजून जातो. त्यानंतर थेट दिवाळीनंतर 31 डिसेंबरपर्यंत या भागात पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.




