आज लोकशाहीचा उत्सव
प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाचा अभेद्य बंदोबस्त तैनात

* शहरातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्यासह कर्मचारी सज्ज
अमरावती /14 जानेवारी : महानगर पालिकेच्या 22 प्रभागांमधील 87 जागांसाठी आज, गुरुवारी 15 जानेवारी रोजी होणार्या मतदानाची संपूर्ण पूर्वतयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. या लोकशाहीच्या महाकुंभासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 661 उमेदवारांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 231 इमारतींमध्ये उभारलेल्या 805 मतदान केंद्रांवर सर्व मतदान पथके कडक पोलीस बंदोबस्तात आपापल्या केंद्रांवर पोहोचली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून, संपूर्ण शहरात सुरक्षेचे कडेकोट वातावरण निर्माण करण्यात आले आहे. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालणार्या या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात एकूण 805 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, त्याठिकाणी एकूण 4500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशा पाच जणांच्या तुकड्या नियुक्त केल्या आहेत. सात निवडणूक क्षेत्रीय कार्यालयांतून सकाळीच मतदान साहित्य घेऊन पथके रवाना झाली होती, जी दुपारी आपापल्या निश्चित केलेल्या इमारतींमध्ये सुरक्षितपणे पोहोचली आहेत. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 37 फिरती पथके संपूर्ण शहरात सतत गस्त घालत राहणार आहेत. तसेच 44 क्षेत्रीय अधिकारी आणि 44 अंमलदार विशेष लक्ष ठेवून आहेत.निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून सर्व 805 मतदान केंद्रांवर ’तिसरी नजर’ म्हणजेच सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण (वेबकास्टिंग) केले जाणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक ठेवण्यासाठी गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली 8 विशेष पथके कार्यरत राहतील. प्रशासनाने या निवडणुकीसाठी 2432 मतपेटी यंत्रे (बॅलेट युनिट) आणि 1226 नियंत्रण यंत्रे (कंट्रोल युनिट) पुरवली आहेत. याशिवाय 3200 मुद्रा आणि पट्ट्यांसह इतर सर्व तांत्रिक साहित्य प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक विभागात ’सखी मतदान केंद्र’ (गुलाबी केंद्र) आणि निसर्गप्रेमींसाठी ’पर्यावरणपूरक मतदान केंद्र’ (हिरवे केंद्र) अशा नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आल्या आहेत.
निवडणूक देखरेख: विशेष दक्षता पथके तैनात-निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी एकूण 27 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भरारी पथके आणि स्थिर संनिरीक्षण पथकांचा समावेश असून ते कायदा व सुव्यवस्थेवर बारीक नजर ठेवतील. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी ही पथके सज्ज असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारावर त्वरित कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




