पोस्टमार्टेम अहवालानंतर महिलेच्या खुनाचा थरारक उलगडा
आरोपी गोलू ठाकरेच्या कबुलीने खळबळ

-मीनाबाजारातून थेट मृत्यूकडे
-जन्माष्टमीच्या भेटीत शोकांतिका
धारणी / 26 ऑगस्ट : धारणी शहर हादरवून सोडणार्या खून प्रकरणाचा अखेर थरारक उलगडा झाला आहे. सौ. इंद्रलता मोहन जाधव (36, रा. प्रीतमपुर, म. प्र., हल्ली मुक्काम धारणी) हिचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या खून प्रकरणी गजानन उर्फ गुरु गोलू रामसिंग ठाकरे (वय 35, रा. धारणी) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून खून केल्याची कबुली मिळविली आहे.
21 ऑगस्ट रोजी सकाळी वार्ड क्र. 6 मधील चक्कीजवळ इंद्रलता जाधव यांचा मृतदेह आढळला होता. चेहर्यावर मारहाणीच्या खुणा व जखमा दिसून आल्याने हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी राकेश सजीलाल काजल (40, रा. वार्ड 6, धारणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक इंद्रलता ही 15 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी-रक्षाबंधनासाठी आपल्या भावाकडे आली होती. 20 ऑगस्टच्या रात्री ती आरोपी गजाननसोबत मीनाबाजार मेळ्यास गेली परंतु परतली नाही. दुसर्याच दिवशी तिचा मृतदेह सापडला.
या गुन्ह्याचा तपास पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश झाल्टे व पथकाने हाती घेतला. आरोपी गजानन ठाकरे हा घटनेनंतर सलग चार दिवस बेपत्ता असल्याची माहिती मिळताच त्याचा मागोवा घेण्यात आला. बातमीदारांच्या खात्रीलायक टिपवरून तो महाराष्ट्र सीमा भागातून जेरबंद करण्यात आला. चौकशीत त्याने इंद्रलता जाधव हिचा खून केल्याची कबुली दिली. सध्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेने धारणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




