जर्जर रेल्वे उड्डाणपुलाचा वरचा भाग पाडणार

संकट टाळण्यासाठी डी-लाँचिंगची तयारी

-जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांचे आदेश
अमरावती / 17 सप्टेंबर : अमरावती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला सुमारे साठ वर्षे जुना रेल्वे उड्डाणपुल आता पूर्णपणे निष्प्रयोज्य व धोकादायक ठरला आहे. यामुळे 23 जुलै रोजी प्रथम टप्प्यात पुलावरील भारी वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. त्यानंतर 23 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसह पदपथावरील पादचार्‍यांची हालचालही थांबवून पुल सर्वस्वी बंद करण्यात आला. गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर अचानक मध्यरात्री निर्णय लागू केल्याने शहरातील पर्यायी रस्त्यांवर भीषण वाहतूककोंडी झाली होती.
तथापि पुलाखालून अद्याप 30 रेल्वेगाड्यांची व इतर वाहतुकीची ये-जा सुरू आहे. मात्र यालाही गंभीर धोका असल्याने तीन ठिकाणी टनेलसदृष्य जागांवरील पुलाचा भाग उचकटून ‘डी-लाँचिंग’ प्रक्रियेद्वारे पाडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख असलेले आशीष येरेकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. भूगर्भ व स्थापत्य अभियांत्रिकीचे ज्ञान असल्यानं त्यांनी स्वतः या विषयाचा अभ्यास करून रेल्वेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढाकार घ्यायला लावला.
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी येरेकर यांनी भुसावळचे रेल्वे वरिष्ठ विभागीय अभियंता सुशांत मुसले यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर संयुक्त सर्वेक्षण करून डी-लाँचिंगचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेचे सहायक विभागीय अभियंता विनोद राणे यांनी यासंदर्भात पुष्टी देत आगामी दोन दिवसांतच रेल्वे यंत्रणा अमरावतीत दाखल होणार असल्याचे सांगितले. डी-लाँचिंगनंतर अंबापेठ, रायली प्लॉट आणि स्टेशन चौक ते राजापेठ या मार्गावरील पुलाचा भाग हटवला जाणार आहे. परिणामी रेल्वे गाड्यांची वाखाणण्याजोगी सुरक्षित वाहतूक अबाधित राहील. राजापेठकडे जाणारे मार्ग पर्यायी म्हणून पूर्ववत सुरू राहतील.
नव्या उड्डाणपुलास वेळ लागणार असल्याने दरम्यान वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी तीन उपाय सुचवले आहेत. नेहरू मैदानातून जयस्तंभ चौक-राजकमल दरम्यान तात्पुरता मार्ग करणे, हमालपुरा-एसटी स्टँड मार्ग रूंदावणे, स्टेशनमार्गे बेलपूरा-राजापेठकडे जाणार्‍या रस्त्याचा विस्तार करणे या पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा स्ट्रक्चरल रिपोर्ट मागवला आहे. रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्त निरीक्षण करून योग्य तांत्रिक उपाययोजना आखणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button