राज्यात गुंडांचे राज्य आणि कायद्याचे धिंडवडे

सत्ताधारीच बनले लोकशाहीचे भक्षक हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रहार

* पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारीचा विळखा घट्ट

अमरावती/ 7 जानेवारी : महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून संपूर्णपणे ‘गुंडाराज’ फोफावले आहे आणि या भीषण परिस्थितीला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना रान मोकळे झाले असून, सर्वसामान्य जनतेची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि सत्ताधार्‍यांकडून सुरू असलेल्या दडपशाहीचा पाढाच वाचला. यावेळी अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येचा दाखला देत, ही घटना राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा पुरावा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, सध्या महाराष्ट्र कोयता टोळ्या, अमली पदार्थ तस्कर, वाळू माफिया आणि भू-माफियांच्या विळख्यात अडकला आहे. या गुन्हेगारीचे लोण आता शहरातून थेट गावागावात पोहोचले आहे. राज्यातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले असून सत्ताधारी पक्षातील लोकच आता गुंडांची भूमिका बजावत आहेत. विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा आणि पैशाचा नग्न नाच सुरू आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था राहिली नसून ती सत्ताधार्‍यांच्या हातातील बाहुले बनली आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली.
निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे पैशांचा गैरवापर झाला, तोच प्रकार आता महापालिका निवडणुकीतही राबवला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना उघडपणे धमकावले जात असून, त्यांच्यावर मानसिक व राजकीय दबाव आणला जात आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ’बिनविरोध’ निवडीसाठी गुंडगिरीचा आधार घेत आहेत, ही लोकशाहीसाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. विधानसभा अध्यक्षांसारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनेही निवडणुकीच्या रिंगणात हस्तक्षेप करून निवडणूक अधिकार्‍यांवर दबाव आणणे, हे संविधानाचा अपमान करणारे आहे. या सर्व ’बिनविरोध’ झालेल्या जागांची चौकशी करून तिथे पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
भाजप आणि एमआयएम यांच्यातील छुपे संधान उघड करताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एमआयएमला उमेदवार देण्यास सांगत असून, एमआयएम ही प्रत्यक्षात भाजपची ’बी’ टीम म्हणून काम करत आहे. काँग्रेसची भाजपशी कोणत्याही स्तरावर युती नाही आणि तशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, भैय्या पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सपकाळ यांचे सरकारवर गंभीर शरसंधान-राज्यात सध्या कोयता गँग, अमली पदार्थ आणि वाळू माफियांचे पेव फुटले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. हिदायत पटेल यांची हत्या हे प्रशासकीय अपयशाचे लक्षण आहे. सत्तेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुंडगिरीचा वापर करत असून, निवडणूक आयोग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळेच महाराष्ट्र आज गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button