त्या महिलेच्या ‘खून’ प्रकरणातील आरोपींचा शोध सुरुच
घटनास्थळी कोणताही संशयास्पद पुरावा आढळून न आल्याने अडचण

वरुड । 5 ऑक्टोबर – गेल्या 2 दिवसांपूर्वी विद्रूप स्थितीत जरुड ते बेनोडा (शहीद) मार्गावरील एका पाणंद रस्त्यावर 60 वर्षीय भाजीपाला विक्री करणार्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता परंतु अद्यापही या महिलेच्या खुनी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. विशेष म्हणजे या खुन प्रकरणातील आरोपींनी कोणत्याही प्रकारचे पुरावे घटनास्थळी न सोडल्याने आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर पूर्णपणे निर्मनुष्य असल्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. मृत महिला ही सर्वसाधारण असल्यामुळे तिच्यासोबत दुष्मनी करणार तरी कोण आणि केली तर ती कशा साठी? यासह अनेक प्रश्न या प्रकरणात उभे ठाकले आहेत, त्यामुळे महि लेच्या खुन प्रकरणातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना मोठी कसरत घ्यावी लागत आहे.
सविस्तर माहीतीनुसार, गेल्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास जरुड ते बेनोडा महामार्ग नजीक असलेल्या पाणंद रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे या महिलेचा दगडाने ठेचुन खून करण्यात आला होता. अशा स्थितीत ती महिला कोण? याचा शोध घेण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर असतांना अवघ्या काही कालावधीतच सदर महिलाही बेनोडा शहीद येथील असल्याचे आणि तिचे नाव सरस्वती उईके असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास आरंभीला होता. असे असतांना या महिलेबाबत अधिक माहिती घेतली असता ती महिला ठोक विक्रेत्यांकडून भाजीपाला विकत घेऊन ती तालुक्यातील विविध आठवडी बाजारामध्ये जाऊन त्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले, तर सातत्याने आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या सरस्वतीबाई हिचा खुन कोण आणि का करणार? याबाबत पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला होता. त्यामुळे घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचे पुरावे प्राप्त न झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपी शोधण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. पोलिसांनी त्या दिशेने आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारचा सुगावा मिळत नसल्यामुळे अद्यापही पोलिसांना याबाबत आरोपींचा शोध घेण्यास अडचण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात खोलवर जाऊन आरोपीचा शोध घेणार असल्याचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी सांगितले.




