कारमध्ये स्वार मद्यधुंद युवकांचा धिंगाना

इर्विन-पंचवटी मार्गावर खळबळ

-दुचाकी आणि कारला धडक
-चाकूच्या बळावर पसरविली दहशत
अमरावती / 22 जुलै : मद्यधुंद युवकांनी आज मंगळवारी दुपारी इर्विन ते पंचवटी चौकादरम्यान बेफामपणे कार पळवून चांगलाच धिंगाणा घातला. या प्रकारामुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण होउन चांगलीच खळबळ उडाली होती. युवकांच्या या कारने अन्य एका कार आणि दुचाकीला धडकही दिली. काही लोकांनी या युवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चाकूच्या बळावर त्यांना धमकावले आणि दहशतही पसरविली. सूचना मिळाल्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी इर्विन चौकात शिताफीने या युवकांची कार थांबविली आणि त्यांना ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी एमएच 27 / बीई 0236 क्रमांकाच्या कारमधून दारुच्या नशेत धुंद असलेले हे युवक पंचवटी चौकात पोहोचले. त्यानंतर इर्विन चौकाच्या दिशेने कुणाचीही पर्वा न करता त्यांनी आपली कार प्रचंड वेगात बेफामपणे पळवायला सुरुवात केली. या युवकांनी घातलेल्या गोंधळामुळे अन्य वाहनचालक गोंधळून गेले होते. जो-तो कारच्या सपाट्यात येउन आपला जिव जाउ नये, म्हणून तारेवरची कसरत करताना दिसत होता. काही लोकांनी हिंमतीने त्यांना थांबवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चाकूचे भय दाखवून त्यांनी दहशतही निर्माण केली होती.
या कारने एमएच 29 / एस 9574 क्रमांकाची दुचाकी आणि एमएच 27 / एआर 6210 क्रमांकाच्या एका कारला धडकही दिली. सुदैवाने त्यात जिवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमीही झाले नाही. पण मद्यधुंद युवकांच्या या धिंगाण्यामुळे या मार्गावर काही काळ लोक प्रचंड भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत कोणीतरी शहर कोतवाली पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी तातडीने इर्विन चौकात पोहोचून सापळा रचला आणि शिताफीने ही कार थांबविली. कारमधील सर्व युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दारुच्या नशेत धुत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या युवकांची सामान्य रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. पुढील चौकशी कोतवाली पोलिस करित आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button