भटक्या कुत्र्यांची महापालिका करणार नसबंदी
भटक्या कुत्र्यांची महापालिका करणार नसबंदी

नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्र. 6005185660
अमरावती / 23 जानेवारी -अमरावती शहरात सध्या भटक्या श्वानांच्या दहशतीने सीमा ओलां डली असून तब्बल एक लाख श्वानांनी संपूर्ण शहराला वेढा घातला आहे. गेल्या वर्षभरात सहा हजारांहून अधिक नागरिकांना या कुत्र्यांनी आपले शिकार बनवले असून दररोज कोठेतरी श्वानांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. केवळ चावाच नव्हे, तर दुचाकींचा पाठलाग केल्यामुळे होणार्या अपघातात शंभरहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरवासीयांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहराची साडे नऊ लाख लोकसंख्या असताना वाढती श्वानसंख्या चिंतेचा विषय ठरली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीची प्रक्रिया दीर्घकाळ रखडल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र, आता महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. सचिन बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता दूर करून नसबंदीसाठी विशेष शल्यचिकित्सा केंद्र, सुसज्ज रुग्णालय आणि निवारा केंद्रे उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळे थांबलेल्या या कामाला आता वेग मिळणार असून नागरिकांच्या तक्रारींसाठी 6005185660 हा मदत क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीबाबतही प्रशासन कडक पावले उचलत असून केवळ 60 जणांनीच परवाना घेतल्याचे समोर आले आहे. प्राणीप्रेमींचा विरोध आणि तांत्रिक अडचणींवर मात करून आता निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरणाद्वारे अमरावतीकरांना या त्रासातून मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.बॉक्स: पाळीव श्वानांचा परवाना घ्या अन्यथा कारवाई शहरात अंदाजे चार हजार घरांमध्ये पाळीव कुत्रे आहेत, मात्र त्यातील केवळ साठ मालकांनीच अधिकृत नोंदणी केली आहे. विनापरवाना कुत्रे पाळणे आता महागात पडू शकते. महानगरपालिकेने सर्व श्वानमालकांना आपल्या पाळीव प्राण्यांची नोंदणी करून परवाना घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांची गणना भटक्या कुत्र्यांच्या श्रेणीत होणार नाही.




