कारच्या धडकेत भिकारी महिलेचा मृत्यु
हरिसाल येथील घटना

अमरावती / 29 जून: रस्त्यावर भीक मागत असलेल्या एका महिलेला भरधाव वेगात असलेल्या कारने धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही घटना धारणी तालुक्यातील हरिसाल येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दुर्गा हरिचंद धुर्वे असे मृतक महिलेचे नाव आहे.
दुर्गा धुर्वे ही हरिसाल येथीलच रहिवासी होती. ती सरकारी दवाखान्यासमोर भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवित होती. शनिवारी सायंकाळी दुर्गा दवाखान्यासमोर भीक मागत असताना भरधाव वेगात आलेल्या एमएच 27 / बीई 5318 क्रमांकाच्या कारने तिला जोरदार धडक दिली. त्यात दुर्गा धुर्वेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन भालेराव नामक आरोपी कार चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून महिलेच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.




