अंध विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन
राष्ट्रीय जुडो स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

अमरावती /4 जानेवारी – स्थानिक द ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने चालवण्यात येणार्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळेतर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रविवार रोजी थाटात पार पडले. आजपासून सुरु झालेला हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 6 जानेवारी 2026 पर्यंत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. अंध लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात दृष्टि बाधित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सन्मान देण्याबरोबरच त्यांच्या सुप्त कौशल्यांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. उद्घाटन सोहळा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती माया केदार यांच्या शुभहस्ते लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध उद्योजक राजेश गेही यांनी सांभाळले, तर प्रमुख पाहुणे प्रतीक गिरी, अतुल कुकरेजा, नंदलाल गेही आणि विशेष अतिथी चंदूभाऊ सुजोतिया उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी, सचिव अॅड. प्रदीप श्रीवास्तव, कार्यकारणी सदस्य आर. एम. अमृते, सल्लागार रतन कांबळे, मुख्याध्यापक एन. एस. इंगोले व व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल यांनी देखील कार्यक्रमाला मान्यता दिली. सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी लुई ब्रेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सादरीकरण केले. याचबरोबर, राजस्थानमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या 14व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक जुडो स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव अॅड. प्रदीप श्रीवास्तव यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन निदेशक कु. अश्विनी सरोदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एन. एस. इंगोले यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहित केले. कार्यक्रमामध्ये गायन, नृत्य, नाट्य व कला सादरीकरणाचा समावेश होता, ज्यामुळे स्नेहसंमेलनाचे वातावरण अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी बनले. उद्घाटन सोहळ्यात आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दृष्टि बाधित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या कलागुणांचा अनुभव घ्यावा. या कार्यक्रमासाठी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यामुळे स्नेहसंमेलन यशस्वीपणे संपन्न झाले.




