महापालिकेतील कंत्राटी कर्मचार्‍याची आत्महत्या

राहत्या घरीच घेतला गळफास

-बडनेराच्या माळीपूर्‍यातील घटना
अमरावती / 13 जुलै: एका 38 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बडनेरा जुनीवस्ती परिसरातील माळीपूरा भागात शनिवारी रात्री घडली. नवल सुरेश बोबडे असे मृतकाचे नाव आहे. नवल हा अमरावती महानगरपालिकेत जन्म-मृत्यु विभागात कंत्राटी तत्वावर नोकरीला होता.
शनिवारी सुटी असल्याने नवल बोबडे काल आपल्या घरीच होता. सकाळी आंघोळ केल्यानंतर तो घराबाहेर गेला. दुपारी 1 वाजता घरी परत आल्यानंतर त्याने जेवण केले. त्यानंतर तो आपल्या दुसर्‍या माळ्यावरील खोलीत गेला. सायंकाळी 7 वाजल्यानंतरही तो खोलीतून बाहेर न आल्याने त्याला बोलाविण्यासाठी वडिल सुरेश बोबडे त्याच्या खोलीजवळ गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी नवलला बरेच आवाज दिले पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तोपर्यंत आजूबाजूचे लोक गोळा झाले होते.
त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, नवल हा खोलीतील लोखंडी एंगलला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यु झाला होता. घटनेची माहिती परिसरात पसरताच बोबडे यांच्या निवासस्थानी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. माहिती मिळाल्यानंतर बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन नवलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. नवलने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट होउ शकले नाही. बडनेरा पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button