अटकेतील आरोपींकडून वाहनचोरीच्या सहा घटना उघडकीस
गडचिरोलीत केली होती विक्री

-5.20 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 18 जून: वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनेत हात असल्याची कबुली पोलिसांनी वदवून घेतली आहे. या आरोपींच्या चौकशीतून एकुण सहा दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. राजापेठ पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोटरसायकलींसह एकुण 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
साहिल अनिल राउत (20, खरैय्या नगर, महेंद्र कॉलनी) आणि पराग मनीष अग्रवाल (24, धनश्री कॉलनी, दस्तुर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. 30 मे रोजी एमआयडीसी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दर्शन अरुण जावरकर यांची दुचाकी चोरण्यात आली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी साहिल राउत आणि पराग अग्रवाल या दोघांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरात घडलेल्या सहा दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये हात असल्याचे मान्य केले. चोरीच्या दुचाकी गडचिरोली येथे रामनगर भागात राहणार्या अझर फारुख हुसैन सिद्धीकी या 29 वर्षीय युवकाला विकल्याचे त्यांनी सांगितले. अझरला या प्रकरणात तिसरा आरोपी करुन पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक पुनित कुलट, उपनिरिक्षक मिलींद हिवरे, हेकाँ पंकज खटे, रवी लिखितकर, मनराज राउत, विजय राउत, सागर भजगवरे, अर्जून कदम, अंकेश सिरसाठ, निखिल माहुरे, अनिकेश वानखडे यांनी केली.




