चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 76 हजारांवर

सराफा बाजारात अभूतपूर्व परिस्थिती, ऑर्डर बंद

अमरावती /10 ऑक्टोबर : सोने आणि चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे स्थानिक सराफा बाजारात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने आणि चांदीची बुकिंग थांबवण्यात आली असून ही परिस्थिती गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून शुक्रवारीदेखील कायम होती. व्यापाऱ्यांकडून दुपारी चांदीच्या आभूषणांची ऑर्डर पुन्हा बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत केलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी केव्हा होईल, याबाबत निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यापाऱ्याने आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, व्यावसायिक व गुंतवणूकदार नोटांचे बंडल घेऊन सराफा व्यावसायिकांकडे फिरत आहेत; परंतु चांदीचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

गुरुवारी अचानक चांदीच्या दरात 12 हजार रुपयांनी वाढ झाल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 71 हजारांवर पोहोचले होते. यामुळे जीएसटीसह चांदीचा दर एक किलोसाठी सुमारे 1 लाख 76 हजारांवर पाहायला मिळत असल्याची माहिती शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

पुढील आठवड्यात धनत्रयोदशी आणि धनतेरस साजरी केली जाणार आहे. या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे घाऊक विक्रेत्यांकडे किरकोळ विक्रेत्यांची गर्दी वाढलेली आहे. पायातील जाडे, महिलांचे विविध प्रकारचे दागिने, दीपक, नाणी आदींना मोठी मागणी असते. यावर्षी चांदीच्या नाण्यांच्या विक्रीत जुने सर्व रेकॉर्ड तुटतील, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button