मुतारी, स्मशानभूमी, दारू दुकानांवर शिवरायांची पोस्टर्स
शहरात धक्कादायक प्रकार, युवक काँग्रेसचा संताप

-पोस्टर्स झाकली, गुन्हा दाखल करण्याची मागणी
-शहर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार
अमरावती / 16 सप्टेंबर : शहरातील मुतारी, स्मशानभूमी, दारू दुकाने व सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांसह छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्टर्स लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अशा अपमानास्पद ठिकाणी छत्रपतींची प्रतिमा प्रदर्शित केल्यामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान होत असून सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या घटनेविरोधात युवक काँग्रेस पदाधिकारी संतप्त झाले असून त्यांनी धर्मादाय कॅाटन फंड व बच्छराज प्लॉट परिसरात लावलेली पोस्टर्स तत्काळ झाकून टाकली. त्यानंतर सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडण्यात आले. युवक काँग्रेसने संबंधित समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच अपमानास्पद ठिकाणी लावलेली पोस्टर्स त्वरित काढून टाकावीत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकेने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी भूमिका पदाधिकार्यांनी या आंदोलनादरम्यान मांडली.
2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर महापुरुषांचा वारंवार अवमान होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने यावेळी केला. कधी त्यांच्या विचारांचा विपर्यास केला जातो, तर कधी प्रतिमांचा गैरवापर करून जनतेच्या भावना दुखावल्या जातात. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे किरकोळ म्हणून दुर्लक्ष करू नये, तर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी युवक काँग्रेसने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अवमान करणार्यांविरुद्ध तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन दिले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे वैभव देशमुख, समीर जवंजाळ, सागर कलाने, आशिष यादव, निखिल बिजवे, संकेत साहू, शुभम बांबल, चैतन्य गायकवाड, धनंजय बोबडे, मोहीत भेंडे, शुभम हिवसे, कृणाल गावंडे, कौस्तुभ देशमुख, केदार भेंडे, अभिषेक भोसले, साहिल वानरे आणि निशांत पवार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




