दीड वर्ष अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
गर्भधारणेनंतर बलात्काराचा गुन्हा

-जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढले
अमरावती / 11 जुलै: अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार तसेच अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे आणि त्यातून तिच्यावर गर्भारपण लादण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे. कालच जिल्ह्यातील कुर्हा आणि अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बालविवाहातून गर्भधारणा झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पतीवर बलात्काराचे गुन्हे दाखल करुन बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर आज पून्हा असाच काहीसा प्रकार पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणातही मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय नरसिंह बेठे (25, बोराळा) असे आरोपीचे नाव आहे. पिडितेचे वय सध्या 18 वर्ष 4 महिने आहे. अक्षय आणि पिडिता गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणे सोबत राहत होते. तेव्हा पिडिता ही अल्पवयीन होती. हे माहिती असूनही अक्षय बेठे याने तिच्याशी लैंगिक संबंध स्थापित केले. त्यातून मुलीला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर उपचाराकरिता दवाखान्यात गेल्यानंतर पिडिता अल्पवयीन असतानाच तिच्याशी लैंगिक संबंध स्थापन करण्यात येउन तिच्यावर गर्भारपण लादण्यात आल्याची बाबत डॉक्टरांच्या लक्षात आली.
याबाबत लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या मुलीचे बयाण नोंदवून घेतल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पिडितेची तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपी अक्षय बेठे याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.




