प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात गंभीर त्रुटी
खा. बळवंत वानखडेंकडून पाहणी

-मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय
अमरावती / 20 जून: अमरावती शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाची आज अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी अनौपचारिक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बांधकामाच्या गुणवत्तेत आणि अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
या पाहणीवेळी खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, योजनेचे लाभार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते संजू थोरात, संजय महाजन आणि अमरावती शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार वानखडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, अमरावती शहरात या प्रकल्पातील कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असून, कामाची गती देखील असमाधानकारक आहे.
याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपल्या व्यथा मांडल्या. घरांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या. अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम अर्धवट असल्याचे, तर काही ठिकाणी ठरलेल्या मानकांनुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. ही संपूर्ण बाब अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू लाभार्थींना लवकरात लवकर दर्जेदार घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले. खासदारांच्या या पाहणीतून प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून सुधारणा करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.




