योग प्रशिक्षक व निसर्गोपचार सहाय्यक म्हणून निवड
श्री हव्याप्र मंडळाच्या दोन विद्यार्थ्यांची व्हिएतनाम येथे

अमरावती /2 जानेवारी : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचलित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथील योग विभागातील दोन विद्यार्थ्यांची व्हिएतनाम येथे योग प्रशिक्षक व निसर्गोपचार सहाय्यक म्हणून निवड झाली असून त्यांनी नुकतेच तेथील योग अँड हेलन हेल्थ केअर सेंटर, होची मिन सिटी, व्हिएतनाम येथे आपल्या सेवेला प्रारंभ केला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्री एकनाथ डुकरे आणि श्री बादल साबळे यांचा समावेश आहे.
श्री एकनाथ डुकरे यांनी बी.ए. योगशास्त्र, एम.ए. योगशास्त्र तसेच योग व निसर्गोपचार विषयातील डिप्लोमा महाविद्यालयातून पूर्ण केला असून त्यांनी मसाज थेरपीचे प्रशिक्षणही घेतले आहे. तर श्री बादल साबळे यांनी बी.ए. योगशास्त्र आणि एम.ए. योगशास्त्रचे प्रशिक्षण यशस्वी रीत्या पूर्ण केले आहे. डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या योग विभागातून यापूर्वीही अनेक विद्यार्थी परदेशात कार्यरत झाले असून, आतापर्यंत 17 विद्यार्थी व्हिएतनाम, दुबई यांसारख्या देशांमध्ये यशस्वीरीत्या प्लेस झाले आहेत. त्यामुळे योग शिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थेची ओळख अधिक दृढ होत आहे. व्हिएतनाममध्ये कार्यरत असलेले संस्थेचे माजी विद्यार्थी श्री हेमंत भिवारकर यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ डुकरे यांनी अत्यंत प्रतिकूल व शेतकरी कुटुंबातील गरीब परिस्थितीतून संघर्ष करत हे यश संपादन केले आहे. तसेच बादल साबळे यांनी कमवा आणि शिका या तत्त्वावर शिक्षण पूर्ण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर योगसेवेसाठी निवड मिळवली आहे. या दोघांचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रा. नितीन काळे व योगशास्त्र विभागातील सर्व सहाय्यक प्राध्यापकांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




