शासकीय परवानगीशिवाय लाखो रुपयांची भंगार विक्री

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात घोटाळा

-वैद्यकीय अधीक्षकांवर भ्रष्टाचाराचे आरोप
-नागरिकांचा संताप, दोषींवर कारवाईची मागणी
अचलपूर / 21 सप्टेंबर : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आलेल्या भंगार घोटाळ्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या कारकिर्दीतील हा नवा वादग्रस्त प्रकार असून, नागरिकांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉ. ढोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा कारभार सतत वादग्रस्त राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच कर्मचार्‍यांशी गैरवर्तन व मानसिक छळप्रकरणी त्यांना माफी मागावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा भंगार घोटाळ्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील जुनी उपकरणे, पंखे, खुर्च्या, टेबल, स्टूल, अलमारी, दरवाजे, टीन इत्यादी साहित्य डॉ. ढोले यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता भंगार म्हणून विकून टाकले. आश्चर्य म्हणजे, या विक्रीसाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा सरळ वापर करण्यात आला. नागरिकांच्या मते, हे भंगार कुटीर रुग्णालयात हलवले जात आहे असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ते भंगार 102 अ‍ॅम्ब्युलन्स आणि काही 407 मालवाहू ट्रकांमधून थेट बाजारात विकण्यात आले. या विक्रीसंदर्भात कोणतेही अधिकृत आदेश किंवा लेखी नोंद उपलब्ध नसल्याने हा प्रकार अधिकच संशयास्पद ठरतो आहे.
अचलपूर-परतवाडा शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. जे अधिकारी भंगारसारख्या किरकोळ बाबीतही भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही तर शासकीय यंत्रणांवरील विश्वास कायमचा ढासळेल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे डॉ. ढोले यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे. स्थानिक सामाजिक संघटना व नागरिकांनी जिल्हा शल्यचिकित्सक व उपसंचालक, आरोग्य सेवा यांनी तातडीने या प्रकरणात दखल घेऊन सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही.

संबंधित बातम्या

Back to top button