मनपाच्या रद्द प्रमाणपत्र प्रकरणात घोटाळ्याचा स्फोट

504 आरोपींच्या यादीत बनावट नावे, आधीच रसीद घेतलेलेही ‘गुन्हेगार’

अमरावती /6 नोव्हेंबर – मनपाच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या फर्जी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात चक्क गोंधळाच उघड झाला असून, 504 आरोपींची यादीच विश्वसनीयतेच्या पारड्यात हलकी पडत आहे. अनेकांची नावे दोन-तीन वेळा नोंदवली जाणे, आधीच प्रमाणपत्र जमा करून रसीद घेतलेल्या नागरिकांनाही आरोपी बनवणे, आणि चुकीच्या पत्त्यांचे दावे या सर्वामुळे मनपावरच संशयाचे सावट गडद होत आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर असूनही, दीड महिना मुदत बाकी असताना मनपाने घाईघाईत पोलिसांत तक्रार दाखल केली. भाजप नेते किरीट सोमैया यांच्या अमरावती दौर्‍याच्या काही तास आधीच कारवाई झाल्याने, या हालचालीवर हेतूपूर्वक घाईचा संशय व्यक्त होतो आहे. तक्रारीतील 504 नावांची पडताळणी करताना पोलिसांनाही अक्षरशः कसरत करावी लागत आहे. अनेक नागरिकांची नावे दोन ते तीन वेळा पुनरावृत्तीने नोंदली गेली आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे काही नागरिकांनी यापूर्वीच आपली रद्द प्रमाणपत्रे मनपात जमा करून त्याची अधिकृत रसीद मिळवलेली असतानाही त्यांना ‘आरोपी’ म्हणून यादीत टाकण्यात आले आहे. मनपाने दावा केला होता की अनेक आरोपी दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत. परंतु तक्रारीची माहिती मिळताच हेच नागरिक स्वतः सिटी कोतवालीत हजर होत, वैध कागदपत्रे दाखवून मनपाचा दावा फोल ठरवत आहेत. मनपाचा एकही कर्मचारी पत्त्यावर आला नाही, तसेच प्रमाणपत्र रद्द केल्याची नोटीसही आम्हाला मिळाली नाही, असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मनपाचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे हेच आता संशयाच्या कठड्यात उभे राहत आहेत. घाई, पुनरावृत्तीची नावे, आधीच रसीद घेतलेल्या लोकांवर गुन्हा, अपूर्ण पडताळणी या विसंगतीमुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शहरात उग्र होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button