कर्जमाफीसाठी प्रहारचे रस्तारोको : महामार्गावर जाळले सोयाबीन
बच्चू कडू आक्रमक : शेकडो प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर

तिवसा /7 ऑक्टोबर : आज तिवसा शहरात प्रहार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निर्धार मेळावा आयोजित केला गेला. या पार्श्वभूमीवर अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सरकारच्या निषेधार्थ रोको आंदोलन करण्यात आले आणि मार्गावर टायर जाळून आंदोलने केली गेली. या वेळी माजी मंत्री बच्चू कडू, तसेच प्रहार पक्षाचे अन्य नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून त्यांना राज्य सरकारकडून वचन दिलेल्या सहाय्याचे पालन झालेले नाही, असे पक्षाने ठळक केले. प्रहार पक्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळाची जाहीरातीसाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी आणि दिव्यांग व विधवा महिलांसाठी मानधन वाढवण्यासाठी मागणी करत आहे.
यावेळी अमरावती–नागपूर महामार्गावर तिवसा, अमरावतीसह बाहेरच्या जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनात माजी मंत्री बच्चू कडू, बल्लू जावळाळ, संजय देशमुख, योगेश लोखंडे, गजानन लोखंडकर, संतोष कीटूकले, पिंटू दांडगे, मंगेश देशमुख, नितीन टाकरखेडे, अमित ठाकूर, बंटी रामटेके, प्रदीप बंड, कुलदीप वस, नितीन आग, बिपिन चाधैरी, नंदू कुंठे, बाळा देशमुख, प्रकाश सोनोने, चंदू वडस्कर, सौ. गौरी दशे, प्रियंका लाखे डांगे इत्यादी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर नागपूरात 28 रोजी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी महा हक्क परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्या परिषदेसाठी आज तिवसा शहरातील समर्थ लॉन येथे प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला, जिथे बच्चू कडू यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करत आगामी महा हक्क परिषदेच्या तयारीसंबंधी सूचना दिल्या आणि सर्व शेतकऱ्यांनी नागपूरातील महा हक्क परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.




