नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांच्या स्वप्नांचा झाला चुराडा
वरुड आणि शेंदुरजनाघाटचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव

वरुड। 6 ऑक्टोबर -गेल्या चार वर्षांपासून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांचा आजच्या आरक्षणामुळे चुराडा झाला असून, वरुड आणि शेंदुरजनाघाट शहरात बाशिंग बांधून बसलेल्या एक डझनपेक्षा अधिक भावी नगराध्यक्षांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे “कहीं खुशी, कहीं ग़म” असे चित्र दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांपासून नगराध्यक्षपदाची निवडणूक केव्हा होणार, असा प्रश्न विचारत चातकासारखी वाट पाहणाऱ्या अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे. 27 डिसेंबर 2021 रोजी वरुड नगरपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका केव्हा होतील, याबाबत अनिश्चितता होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश प्रशासन आणि निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अखेर आज मुंबई येथे संपूर्ण राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची सोडत काढण्यात आली.
या सोडतीकडे संपूर्ण राज्यासह मोर्शी मतदारसंघातील मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट येथील नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. राजकीय नेतेही या आरक्षणाकडे टक लावून पाहत होते. शेंदुरजनाघाट आणि मोर्शी नगरपालिकेची स्थिती समजल्यावर सर्वांचे लक्ष वरुड नगरपालिकेकडे वळले होते. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता वरुड नगरपरिषद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांचा हिरमोड झाला.
वरुड आणि शेंदुरजनाघाट नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद यावर्षी खुल्या प्रवर्गासाठी राहील, असा अनेकांचा अंदाज होता. अनेक नेते आणि कार्यकर्ते दोन-तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते. काहींनी भारतीय जनता पक्षातून तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधून आपली दावेदारी पुढे करण्यास सुरुवात केली होती. गेल्या तीन-चार वर्षांत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांद्वारे अनेकांनी स्वतःच्या खिशातून लक्षावधी रुपये खर्च केले. मात्र, आज आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या पदरी निराशा आली.
तथापि, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वरुड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आणि शेंदुरजनाघाट येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने त्या समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्शी मतदारसंघातील वरुड आणि शेंदुरजनाघाट या दोन्ही नगरपालिका संवेदनशील समजल्या जातात. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या ताब्यात या नगरपालिका ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, उमेदवार कोण असणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही नगरपालिकांमध्ये विविध पक्षांकडून किमान दहा-दहा उमेदवार तयारीत होते. आता मात्र नगरसेवकपदाची निवडणूक लढवायची की नाही, राजकारण धरायचे की सोडायचे, असे अनेक प्रश्न या इच्छुकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना “घरचा रस्ता दाखवणारे” राजकारण पाहायला मिळेल, एवढे मात्र निश्चित.
दरम्यान, राज्यातील नगरपंचायतींचे आरक्षणही जाहीर झाले असून बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदिरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
तसेच 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून, देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड आणि शिरोळ या नगरपरिषदांचा यात समावेश आहे.




