अचलपूर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी

राजकारणात नवा खेळ; कही खुशी, कही गम वातावरण

* नेत्यांची नव्या फिल्डिंगला सुरुवात

अचलपूर /6 ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत अध्यक्षपदांच्या आरक्षण यादीने अचलपूरच्या राजकीय वातावरणात एकाच झटक्यात उलथापालथ घडवून आणली आहे. अचलपूर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुला प्रवर्ग (महिला) असे जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात नवे गणित तयार झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अचलपूर शहरातील सर्व प्रमुख राजकीय गोटांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर नव्या पिढीतील अनेक नेत्यांची महत्त्वाकांक्षा बहरात आली होती. सोशल मीडियावर भावी नगराध्यक्ष म्हणून स्वतःचे फोटो व पोस्टर झळकविण्याची चढाओढ दिसत होती, परंतु आरक्षणाची घोषणा होताच अनेकांचे स्वप्न डोळ्यांतच कोसळले.

अचलपूर नगरपरिषद जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने तिच्या अध्यक्षपदाला मिनी आमदार असे संबोधले जाते. त्यामुळे या पदासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये जबरदस्त स्पर्धा अपेक्षित होती, मात्र खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने आता स्पर्धेचे पारडे महिलांकडे झुकले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर स्थानिक गट या सर्वांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना पुढे करण्याच्या चर्चांना सुरुवात केली आहे. मात्र, खर्‍या अर्थाने प्रभावशाली महिला नेतृत्व उभे राहणार का, हा प्रश्न अद्याप कायम आहे. काही ठिकाणी प्रॉक्सी उमेदवार म्हणून पुरुष नेते आपल्या नातेवाईक महिलांना पुढे करतील, अशी कुजबुजही सुरु आहे, त्यामुळे महिला आरक्षणाने समानता साधण्याऐवजी राजकीय घराणेशाहीचे नवीन रूप दिसण्याची शक्यता काहींच्या चर्चेत आहे.

राजकीय वर्तुळात सध्या दिल के अरमाँ आँसुओं में बह गये हेच गाणे घुमत आहे. अनेक उत्साही तरुण नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच आपली पथके तयार केली होती, प्रचाराची आखणीही सुरू होती, परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्व उत्साह ओसरला आहे. काही ठिकाणी नाराजी, तर काही ठिकाणी सूक्ष्म राजकीय हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. अचलपूरच्या नगराध्यक्षपदाची धुरा कोणत्या महिला नेत्याच्या हाती येणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. स्थानिक पातळीवरील अनुभवी महिला नगरसेविका, सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्त्या आणि काही नव्या चेहर्‍यांची नावं चर्चेत येऊ लागली आहेत. पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, अचलपूरमध्ये महिला आरक्षणाने सत्तेचा खेळ नव्या दिशेने वळवला आहे; अनेकांचे स्वप्न मोडले, काहींसाठी नवे दार उघडले आहे, आणि राजकीय रंगमंचावर महिलांचा नवा अंक रंगणार हे निश्चित आहे.

संबंधित बातम्या

Back to top button