अमरावती-मुंबई विमानसेवेचे भाडे कमी करा
वेळ बदलण्याचीही मागणी

-खा. बळवंत वानखडें उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा
अमरावती / 21 जुलै : अमरावती ते मुंबई हवाई मार्गावर अलायन्स एअरकडून चालविण्यात येणार्या विमानसेवेच्या भाड्यांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही विमानसेवा सामान्य प्रवाशांसाठी सुलभ आणि परवडणारी असावी, यासाठी भाड्यात कपात करण्यात यावी अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. वानखडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली. प्रवाशांच्या सुविधेसाठी विमान फेरीच्या वेळांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचेही वानखडे यांनी नायडू यांना सांगितले.
खासदार बळवंत वानखडे यांनी याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांना एक पत्र सादर केले. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले की, अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून, येथे औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक कामकाजासाठी असंख्य लोक मुंबईला जात असतात. विमानाने प्रवास करणार्या नागरीकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत विमानसेवेच्या भाड्यांमध्ये झालेली अनावश्यक वाढ ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तातडीने भाडेवाढीचा फेरविचार करून ती पूर्ववत करावी, अशी मागणी बळवंत वानखडे यांनी केली आहे.
याशिवाय, सद्यस्थितीत अमरावती-मुंबई विमान प्रवासाचा वेळ दुपारी ठेवल्यामुळे अनेक व्यावसायिक आणि कर्मचारी वर्गाला त्याचा फारसा उपयोग होत नाही. अमरावती येथून विमान सुटण्याची वेळ सकाळी आणि मुंबईवरून परतण्यासाठी सायंकाळची ठेवण्यात यावी, जेणेकरून लोक एका दिवसात आपले काम आटपून परत येऊ शकतील, अशीही विनंतीही खासदार बळवंत वानखडे यांनी मंत्र्यांकडे केली आहे. या बैठकीदरम्यान, नागरी उड्डाण मंत्री यांनी खासदार बळवंत वानखडे यांचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं. संबंधित अधिकार्यांकडून तातडीने अहवाल मागवण्यात येईल आणि प्रवाशांच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.




