राजकमल रेल्वे उड्डाणपूलाची पुनर्बांधणी सुरू

चार महिन्यांत पाडकामाचे नियोजन

-जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
-रेल्वे व बांधकाम विभाग कामाला
अमरावती / 29 सप्टेंबर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांनुसार मध्य रेल्वे भुसावळ विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे कार्यवाही सुरू केली आहे. पुल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात स्पष्ट झाल्यानंतर 25 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून आता त्याच्या पाडकामाची (डिसमँटलिंग) योजना अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंदाजे चार महिन्यांत पुलाचे पाडकाम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार पुलावर तडे गेले असून त्यावर कोणतीही गतिमान वाहतूक सुरक्षित नाही. त्यामुळे 25 ऑगस्टपासून सर्व प्रकारची वाहतूक थांबविण्यात आली. तरीही पुलाखालून धावणार्‍या रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेस कोणताही तात्काळ धोका नाही, असा निष्कर्ष 18 व 19 सप्टेंबर रोजी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त पाहणीत नोंदविण्यात आला. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलाच्या ठिकाणी संरचनात्मक बिघाडांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पूर्णवेळ वॉचमन तैनात केला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या असून पुलाजवळ कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहराच्या दळणवळणातील या महत्त्वाच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वेळेची मर्यादा पाळून नियोजन करण्यात आले असून, चार महिन्यांत पाडकाम पूर्ण झाल्यानंतर नवा पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
-आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पुनर्बांधणी प्रक्रियेबरोबरच पुलाची सुरक्षितता आणि देखरेख कायम ठेवण्यासाठी रेल्वे विभागाने आयआयटी, व्हीएनआयटीसारख्या तज्ज्ञ संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिफारस केली आहे. तसेच टिल्ट मीटर्स आणि क्रॅक प्रोपगेशन गेजेस यांसारखी आधुनिक मॉनिटरिंग प्रणाली बसवण्याचे सुचविण्यात आले आहे.
-संयुक्त पथकाची पाहणी
या संपूर्ण पाहणी मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रतीक गिरी, रेल्वेचे उपविभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, सहाय्यक अभियंता एन. प्रकाश रेड्डी आणि स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागार कन्स्ट्रक्शन मॅजिक यांच्या उपस्थितीत तपासणी झाली. बेलपुरा बाजूला बारीक तडे व रायली प्लॉटकडील पुलात मोठे तडे दिसले. मात्र वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने रेल्वे गाड्यांच्या हालचालीवर याचा परिणाम नाही.

संबंधित बातम्या

Back to top button