राजकुमार पटेल यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हा काँग्रेस भवनात भव्य कार्यक्रम

-प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार स्वागत
अमरावती / 15 सप्टेंबर : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल बुधवारी, 17 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा ‘हात’ धरणार आहेत. पटेल यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्याची अधिकृत पुष्टी त्यांचे पुत्र आणि धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी केली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या उत्साहाने होत असलेल्या या प्रवेश सोहळ्यासाठी जिल्हा काँग्रेस भवनात दुपारी 2 वाजता विशेष आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः उपस्थित राहून पटेल व त्यांच्या समर्थकांचे पक्षप्रवेश घडवून आणणार आहेत. जिल्हा व शहरातील अनेक ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी, तसेच माजी मंत्री, खासदारही या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
राजकीय क्षेत्रात पटेल यांची ओळख अनुभवी आमदार म्हणून राहिली आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघातून ते तीनवेळा विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास बहुजन समाज पक्षापासून सुरू झाला व तो पुढे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष अशा विविध टप्प्यांतून गेला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी बच्चू कडू यांनाही पराभव झेलावा लागला.
2024 च्या पराभवानंतर पटेल यांनी स्वतःसाठी नवे राजकीय समीकरण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेशी नजीकचा संपर्क वाढवला होता. मात्र, त्यांचा प्रवेश त्या टप्प्यावर थांबला. याचदरम्यान काँग्रेसकडून त्यांना पक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू झाले. माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकुर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शेवटी पटेल यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 17 सप्टेंबरला होणार्‍या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली, तसेच जिल्ह्याच्या सध्याच्या राजकीय स्थितींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यानुसार, बुधवारी होणार्‍या या कार्यक्रमात माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे सर्व समर्थक औपचारिकरीत्या काँग्रेसमध्ये सामील होणार असून, मेळघाटातील राजकीय समीकरणाला नवे वळण मिळणार आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button