अमरावती जिल्ह्यावर पावसाची तुटवड्याची छाया

खरीप हंगामावर मोठा परिणाम

-काही तालुक्यांत समाधानकारक पाऊस
-तर अनेक भागांत अजूनही अपुरा
अमरावती / 21 सप्टेंबर : हवामान विभागाने 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.40 वा. प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात साधारणपणे 862 मिमी इतक्या पावसाची नोंद व्हावी अशी सरासरी अपेक्षा असताना प्रत्यक्षात फक्त 735.2 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच केवळ 81.8 टक्के पावसावर जिल्ह्यातील शेती व जनजीवन अवलंबून राहिले आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. चांदुर रेल्वे तालुक्यात 119 टक्के, तिवसा तालुक्यात तब्बल 130 टक्के, तर चांदूरबाजार तालुक्यात 120 टक्के पावसाची नोंद झाल्याने या भागांतील शेतकरी समाधानी आहेत. या भागांतील सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस यांसारखी खरीप पिके भरघोस वाढत असून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
मात्र धारणी तालुक्यात फक्त 71.3 टक्के, नांदगाव खंडेश्वरात 76.6 टक्के, भातकुली तालुक्यात 82.6 टक्के तर अचलपूरमध्ये केवळ 69.6 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यांत खरीप पिके मरगळलेली दिसत असून पावसाच्या प्रतिक्षेत शेतकर्‍यांची नजर आकाशाकडे लागली आहे. अमरावती तालुक्यात देखील पाऊस केवळ 84 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 796 मिमी इतके होते. यंदा मात्र फक्त 735.2 मिमी पावसाची नोंद झाल्याने 60 मिमीहून अधिक घट झाली आहे. मागील वर्षीपेक्षा या वर्षी खरीप हंगाम अधिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अपुर्‍या पावसामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पीकविमा, पिकांचे कर्जमाफी, सिंचनासाठी विशेष उपाययोजना आणि तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना जलसंधारणावर भर द्यावा, ओलितावर आधारित पिके घ्यावीत आणि पर्यायी पिकांचे नियोजन करावे, असेही आवाहन केले आहे.
-शेतीवर विपरित परिणाम
काही तालुके वगळता अमरावती जिल्हा हा प्रामुख्याने पावसावर आधारित शेतीसाठी ओळखला जातो. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. अपुर्‍या पावसामुळे या पिकांवर मोठे संकट ओढवले असून उत्पादन घटण्याची भीती आहे. विशेषतः धारणी, भातकुली आणि अचलपूर भागात सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार असून बाजारपेठेत तेलबिया व कापूस उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
-पुढील हंगामाबाबत शंका
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर कमी होत असल्याने पुढील काही दिवसांत विशेष पाऊस होण्याची शक्यता नाही, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके सावरून घेणे कठीण ठरणार आहे. याचबरोबर रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button