मुंबईत उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी 75 हजार कोटींची तरतूद
बच्चू कडूंच्या टीकेने खळबळ

अमरावती /8 ऑक्टोबर : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचे ओशासन दिले असले, तरी याबाबत टाळाटाळ चालवली जात असल्याचा आरोप करत जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. ते सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. बच्चू कडू म्हणाले की, सरकारकडे पैसा आहे, पण तो शेतकर्यांसाठी नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी महायुती सरकारने गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या घरांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तसेच शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले की, सत्तााधारी लोकांकडून सातत्याने निधीची चणचण असल्याचे वक्तव्ये केली जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैशांचे सोंग घेता येत नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी किती सोंग केले होते? सुर्योदय होण्याच्या आधी तुम्ही शपथविधीसाठी तयार होतात, तेव्हा सोंग कोणते घेतले जात होते, असा सवाल त्यांनी केला. सरकारजवळ शेतकर्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, पण निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींसाठी तरतूद केली गेली. त्यामुळे महाराष्ट्राचे बजेट बिघडले नाही, सर्वकाही मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले की, शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकर्यांचा वाली कोणी नसल्यामुळे इतर वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत, तर शेतकर्यांच्या पिकांना कोणताही योग्य भाव दिला जात नाही. त्यांचे सोयाबीन असो, कापूस असो, ते मातिमोल किमतीत खरेदी केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांची बाजू मांडताना सत्ताधारी पक्षांकडून कोणाचाही जीव दिसत नाही, असे त्यांनी निष्कर्ष काढला.
* सरकारला फक्त व्यापार्यांची चिंता
बच्चू कडू म्हणाले की, यंदा निसर्गाने थैमान घातले असून शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडून मदत मिळेल, अशी आशा करत कर्जमाफीची वाट पाहत आहेत, मात्र सरकारला शेतकर्यांची नाही तर व्यापाऱ्यांची चिंता आहे. हे सरकार व्यापाऱ्यांचे हित जपणारे असल्याचेही त्यांनी म्हटले. बच्चू कडू यांनी शेतकर्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, तेव्हाच सरकारला जाग येईल. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला आहे आणि ते येत्या 28 ऑक्टोबरला शेतकर्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी नागपूर येथे धडक देणार असल्याची माहिती दिली.




