प्रणवच्या सतर्कतेमुळे वाचले 45 प्रवाशांचे प्राण
मोठा अपघात टळला

-एसटीच्या देखभालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
टाकरखेडा संभू/ 3 ऑगस्ट : अमरावती-आष्टी मार्गावर रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी 12 वाजताच्या सुमारास टाकरखेडा संभू परिसरात एक मोठी दुर्घटना टळली. एसटी महामंडळाच्या एका प्रवासी बसचे मागील दोन्ही टायर कोटर पिन निघाल्याने टायर मार्गातून बाजूला सरकू लागले होते. सुमारे 45 प्रवाशांनी भरलेली ही बस थोडक्यात मोठ्या दुर्घटनेपासून वाचली आणि याचे संपूर्ण श्रेय जाते टाकरखेडा संभू येथील 18 वर्षीय प्रणव अजय काळे याच्या अतिशय वेळीच घेतलेल्या सतर्कतेला.
प्रणव आपल्या शेताकडे जात असताना त्याच्या नजरेस बसच्या मागील चाकाची अस्वाभाविक हालचाल आली. बारकाईने पाहिल्यानंतर त्याने पाहिले की दोन्ही टायर कोटर पिन निघून गेले असून टायर थोड्या वेळात निघून अपघात घडवू शकतात. त्याने तात्काळ मोठ्याने आवाज करून बस चालकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनाच्या गोंगाटात आवाज पोहचला नाही. त्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डबकीतून पाणी भरले आणि बसच्या काचेला फेकून जोरात मारले. तेव्हा चालकाने गाडी थांबवली. त्यानंतर प्रणवने त्याला टायरबाबत माहिती दिली.
ही माहिती मिळताच चालक आणि उपस्थित प्रवासी हादरून गेले. बस तात्काळ रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. अपघात टळल्यामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. काही महिला प्रवासी घाबरल्या आणि त्यांनी पुढचा प्रवास न करता गावी परतण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी प्रणवचे मनापासून आभार मानले. अनेकांनी त्याचे कौतुक करत त्याला ‘खरा हिरो’ म्हटले. स्थानिक पातळीवरही त्याच्या प्रसंगावधानाचे आणि धाडसाचे कौतुक होत आहे.
ही घटना काही अपवादात्मक नाही. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, याआधीही वलगाव, वायगाव, आष्टी मार्गांवर अशाच प्रकारे टायर सुटण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने युवकांमध्ये जागरूकतेची जाणीव निर्माण केली आहे. प्रणवसारख्या तरुणांनी प्रसंगावधान राखल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. गावातील नागरिकांनी प्रणवला सन्मानित करण्याची मागणी केली आहे.




